Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून तालुक्याच्या ग्रामीण भागात भारनियमन सुरू असल्यामुळे विजेअभावी शेतकऱ्यांना खरीप पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके धोक्यात आली आहेत.
त्यामुळे हे भारनियमन ताबडतोब रद्द करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

तसेच पावसाअभावी खरीप पिके धोक्यात आली असून, गोदावरी कालव्यांना सध्या सुरू असलेल्या बिगर सिंचनाच्या आवर्तनातून खरीप पिकांना सिंचनासाठी त्वरित पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना द्यावेत, अशीही मागणी त्यांनी नामदार फडणवीस यांच्याकडे केली आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून महावितरण कंपनीकडून भारनियमन (लोडशेडिंग) केले जात आहे. या लोडशेडिंगमुळे ग्रामीण भागात विजेची समस्या निर्माण झाली आहे.
भारनियमनाच्या नावाखाली ग्रामीण भागात वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचेही प्रश्न निर्माण झाले आहेत. लोडशेडिंगमुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे.
यंदा पावसाळ्याचे दोन महिने उलटले तरी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीला आलेल्या जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी बाजरी, सोयाबीन, मका, कापूस, तूर, मूग आदी पिकांची लागवड केली. पुढे पाऊस पडेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती; परंतु पावसाने पाठ फिरवल्यामुळे त्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. बहुतांश ठिकाणी शेतातील उभी पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत. त्यातच महावितरण कंपनीने लोडशेडिंग सुरू केले आहे. त्यामुळे पिकांना पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.