पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर आले ‘हे’ संकट ; पिके करपण्याच्या मार्गावर ..!

Pragati
Published:

Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून पावसाने अचानक उघडीप दिल्याने जिल्ह्यातील दक्षिण भागातील खरीप पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. पाऊस लांबल्याने भाजीपाल्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. आठवडाभरात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.

यंदा जून महिन्याच्या सुरुवातीस जिल्ह्यातील बहुतेक भागात समाधानकारक पाऊस झाला. अनेक वर्षांनंतर वेळेवर पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी सुखावला होता. पेरणी केलेले बियाणे उगवले असले, तरी आता पावसाची प्रचंड गरज आहे. उन्हाळ्यासारखे कडक ऊन पडते. त्यातच दुपारनंतर वारा वाहू लागतो. त्यामुळे शेतात असलेली ओल झपाट्याने कमी होत आहे.

यंदा पावसाळ्याच्या सुरवातीला पावसाने दडी मारल्याने चिंतेचे ढग दाटू लागले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करून ठेवली परंतु पावसाचा अद्याप पत्ता नसल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ग्रामीण भागात बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाल्याने सर्वत्र शुकशुकाट पाहावयास मिळत आहे.

येत्या आठ दिवसांत पाऊस न झाल्यास उत्पादनामध्ये घट येऊन अनेक भागातील जिरायत पट्टयातील पिकांची दुबार पेरणी करावी लागणार आहे. पाऊस लांबल्याने बाजारपेठेतही ग्राहकांचा शुकशुकाट असून, व्यापारी वर्गातही चिंतेचे वातावरण आहे. शालेय साहित्य खरेदी-विक्रीचा हंगाम संपला असून, आता अनेकांना पंढरीच्या वारीला जाण्याचे वेध लागले आहेत. बाजारपेठ आणखी किमान महिनाभर तरी शांत राहण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

लांबणीवर पडलेल्या पावसाचा परिणाम कापूस उत्पादनासह फळबागांवर, उडीद, तूर व मूग वाणांच्या लागवडीवर होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना खरिपासाठी आवश्यक असलेली विविध बियाणे, रासायनिक खतांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात होईल. यासाठी कृषी विभागाकडून तयारी करण्यात आली आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe