Ahmednagar News : सध्या राज्यात कांदा उत्पदक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कांद्यावर निर्यातबंदी केल्याने कांद्याचे भाव मातीमोल झाले आहेत. शेतकरी सध्या सरकारविरोधात आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. आता याच अनुशंघाने खा.सुजय विखे यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले खा. सुजय विखे
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदींसह दिल्ली येथे अमित शाह यांना मी भेटणार आहेत.
कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यासाबाबत चर्चा करणार आहे. कांद्याचा भाव स्थिर होण्यासाठी एक मासिक कोटा निश्चित करून कांद्याला हमी भाव मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे खा.डॉ.सुजय विखे यांनी स्पष्ट केले.
नगर तालुक्यातील उदरमल येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी ही भेट घेतली जाणार आहे.
निश्चितच शेतकरी हिताचा विचार केला जाईल असे खा. सुजय विखेंनी यावेळी स्पष्ट केले. त्यांनी महाविकास आघाडीवरही घणाघात केला. ते म्हणाले, मागील दीड वर्षाच्या काळात महायुतीचे सरकार नव्हते तेव्हा मोठ्या प्रमाणात निधीची कमतरता भासत होती.
परंतु आता महायुतीचे सरकार आल्यापासून अहमदनगर जिल्ह्याला कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडत नाही. यापुढेही विविध विकासकामांना प्राधान्य देऊन भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही ते म्हणाले.