कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन नियोजित वेळेपेक्षा चार दिवस आधी म्हणजे १५ फेब्रुवारीला सोडण्यात आले, मात्र पिंपळगाव जोगा कालव्याचे आवर्तन अद्यापही सुरू झाले नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. “कुकडी कालव्याच्या लाभक्षेत्रातील पिके जळत असतील, मग आमची का जळू नयेत?” असा रोष शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अधिकाऱ्यांची टाळाटाळ, आदेश नसल्याचे कारण
पिंपळगाव जोगा कालव्याचे आवर्तन कधी सोडले जाणार, अशी विचारणा शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली असता “वरून आदेश नाही” असे उत्तर देण्यात आले. मागील रोटेशनवेळी कुकडी कालव्याचे पाणी पिंपळगाव जोगा कालव्याचे आवर्तन पूर्ण झाल्यानंतर बंद करण्यात आले होते. मात्र, यावेळी मात्र कुकडी कालव्याला आधी पाणी देण्यात येत असल्याने, शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

पाणी वाटपातील अन्याय, पुणे जिल्ह्यासाठी गुपचूप पाणी
शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागावर अन्यायकारक पाणी वाटपाचा आरोप केला आहे. पारनेर तालुक्यातील मागील आवर्तन बंद झाल्यानंतरही पुणे जिल्ह्यात अनेक दिवस पाणी सुरू होते. कालव्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी पोहोचण्याआधीच पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच, पाण्याचा गेज मिळत नसताना तो जमिनीत दडपण्याचे प्रकार जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून केले जात आहेत, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
रब्बी हंगामातील पिकांना धोका, शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे, शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी मोठा खर्च केला असून, पाणी न मिळाल्यास ही पिके जळून जाण्याचा धोका आहे. रोपे, खते, मशागत यावर मोठा खर्च झाला आहे. शेतकऱ्यांनी पाणी मिळण्याच्या आशेवर नगदी पिके घेतली आहेत.
पाणी न मिळाल्यास संपूर्ण उत्पन्न वाया जाणार आहे.
शेतकऱ्यांनी “जर वेळेवर पाणी येणार नव्हते, तर आम्हाला आधीच कल्पना द्यायला हवी होती. आम्ही रब्बी पिकांवर एवढा खर्च केला नसता,” असे म्हणत प्रशासनाच्या नियोजनावर सवाल उपस्थित केला आहे.
पुणे जिल्ह्यात अतिरिक्त पाणी, पारनेरमध्ये कोरडे कालवे
पुणे जिल्ह्यातील आळेफाट्याच्या परिसरात काही दिवसांपूर्वी अतिरिक्त पाण्यामुळे कांदा खराब होऊ लागल्याने पाणी बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. परिणामी, तिथे लगेच पाणीपुरवठा थांबवण्यात आला. मात्र, पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना अजूनही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.