Ahmednagar News : थकीत पीक विम्याचे पैसे त्वरित न मिळाल्यास गावात येणाऱ्या सर्व राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना जाब विचारण्याचे आंदोलन करण्यात असा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी कृषी आयुक्त कार्यालयावर झालेल्या मोर्चात दिला.
राज्यातील शेतकऱ्यांना २०२३-२४ खरीप व रब्बी हंगामातील पीक विम्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. गेली दीड वर्ष शेतकरी मंजूर पीक विम्याच्या रकमेची वाट पाहत आहेत, आंदोलने करत आहेत मात्र विमा कंपन्या व सरकारी अधिकारी फक्त खोटी आश्वासने व तारखा देत आहेत. पैसे मात्र देत नाहीत. या दिरंगाईला सरकार जबाबदार आहे. शासनाकडून विमा कंपन्यांना पैसे प्राप्त न झाल्यामुळे पीक विमा थकीत आहे.
९ सप्टेंबर रोजी स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली व अलंकार टॉकीज, साधू वासवानी चौक मार्गे सेंट्रल बिल्डिंग येथील कृषी आयुक्त कार्यालयासमोर शेतकरी मोर्चाने गेले. मोर्चा अडवल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
दीड वर्षापासून शेतकरी पीक विम्याच्या पैशाच्या प्रतिक्षेत आहेत मात्र सरकार विम्याचे पैसे देण्यास तयार नाही. सत्ताधारी पक्ष हा विषय गांभिर्याने घ्यायला तयार नाही व विरोधी पक्षही या विषयावर गप्प बसलेले आहेत.
सरकारने पीक विम्याची रक्कम अदा करण्यासाठी आवश्यक तो निधी तातडीने विमा कंपन्यांकडे वर्ग करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करावेत. तसे न केल्यास, गावात येणाऱ्या सर्व राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना जाब विचारण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मोर्चाचे नेतृत्व करणारे अनिल घनवट यांनी दिला.
हे आंदोलन पुढाऱ्यांना गाव बंदी करण्याचे नाही, मात्र गावात सभा घेणाऱ्या राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भाषणाच्या वेळी शेतकरी पीक विमाबाबत जाब विचारतील, असे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्य मंत्र्यांना, कृषी आयुक्ताद्वारे देण्यात आले. शासनाच्या वतीने कृषी उपायुक्त वैभव तांबे यांनी शासनाच्या वतीने निवेदन स्वीकारले.