Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव, पढेगाव, भेर्डापूर, मालुंजा व भामाठाण परिसरातील २०२२ मधील अतिवृष्टी अनुदानापासून वंचित शेतकरी गावातील सरपंचांसह मंगळवार (ता. २६) डिसेंबरपासून शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली येथील तहसील कार्यालयसमोर उपोषण करणार आहे.
या संदर्भात शेतकरी संघटनेच्या वतीने काल मंगळवारी (ता.१९) तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन दिल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी आमदार लहू कानडे यांच्यासह विविध पक्ष व संघटनांनी अनेकदा निवेदने व पाठपुरावा करून अतिवृष्टीच्या अनुदानाची वेळोवेळी मागणी केली.
परंतु लालफितीत अडकलेल्या अन्यायकारक व शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानी कारणीभूत ठरणाऱ्या निर्णयाविरोधात आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मंगळवार (ता. २६) डिसेंबरपासून संतप्त शेतकरी व वरील पाच गावातील सरपंच यांनी अनुदानासाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या दीड ते दोन वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या अतिवृष्टीच्या अनुदानाविषयी तलाठी व कोणताही शासकीय अधिकारी शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती देत नाही. जिल्ह्यातील इतर सर्व गावांना हे अनुदान मिळाले.
मात्र, श्रीरामपूर तालुक्यातील वरील पाच गावे हे वंचित ठेवली. याचे कोणतेही स्पष्ट कारण कोणी सांगत नाही. शेतकरी नेहमीच दुष्काळ अथवा अतिवृष्टी, बदलते हवामान याने त्रस्त आहे.
यात एखादे पीक आले तर त्याची बाजारपेठेत होणारी लूट व हमीभावाची शाश्वती नाही, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. शासनाच्या अनुदानामुळे थोडाफार हातभार लागेल, मात्र ते देखील वेळेवर मिळत नाही.
त्यामुळे जाहीर झालेले अनुदान शेतकऱ्याचे बँक खात्यात जमा होईपर्यंत वरील पाच गावातील सरपंचांसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व वंचित शेतकरी उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधणार आहे. या उपोषणात शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विलास कदम यांनी केले आहे.