Ahmednagar News : लष्कराच्या फायरिंग रेंजसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव आहे. फायरींग रेंजसाठी जमिनी देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध आहे.
ही बाब महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी माझ्या लक्षात आणून दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांचे नुकसान न करता के. के. रेंजचा प्रश्न सोडवू असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार वितरण सोहळयाच्या कार्यक्रमात मंत्री सिंह यांनी शेतकऱ्यांना आश्वासीत केले. पुढे बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, केंद्र व राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे आहे.
पंतप्रधान मोदी यांचा विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी आम्ही काम करत आहोत. लष्कराच्या फायरींग रेंज सरावासाठी राहुरी, पारनेर व नगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात येणार आहे. याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. हे विखे पिता-पुत्रांनी माझ्या निदर्शनास आणून दिले.
आम्ही शेतकऱ्यांच्या भावनांचा सन्मान करत या प्रश्नात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. लवकरच याबाबत दिल्लीत बैठक घेऊन हा प्रश्न सोडवू विरोधकांवर टीका करताना मंत्री सिंह म्हणाले, मोदी यांना विरोध करण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले आहेत.
इंडियाचे नाव घेऊन ते बैठक घेत आहेत. फक्त नाव घेऊन काम चालत नाही. यासाठी चांगलं कार्य करावं लागतं. ते आपण आजपर्यंत केले का? याचा विचार इंडिया गटबंधनातील नेत्यांनी करावा.
पुरस्कार सोहळ्याला पोहोचण्याआधी मंत्री सिंह यांनी साईच्या दरबारात हजेरी लावली. साई समाधीचे दर्शन घेतल्यावर शिर्डी माझे पंढरपूर आरती त्यांनी केली. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी मंत्री सिंह यांचा सत्कार केला.
या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जेथून सहकार उभा राहिला. ती प्रवरानगरची भूमी शेतकऱ्यांची आहे. आज शेतकऱ्यांच्या भूमित देशाचे संरक्षण मंत्री आल्याने खऱ्या अर्थाने जय जवान जय किसान ही घोषणा आठवली आहे.
एक कर्तव्यदक्ष राष्ट्रभक्त ही राजकारणापलिकडे मंत्री सिंह यांची ओळख आहे. मुंबईमध्ये आज विरोधकांची बैठक होत आहे. एन.डी.ए. चा पंतप्रधान मोदी हाच मुख्य चेहरा आहे. आम्ही तर श्रीरामवाले आहोत. रामाचे भक्त आहोत. अनेक चेहरे तर रावनाचे असतात. असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.