Ahmednagar News : नगर तालुक्यातील इमामपूर येथे बुधवारी (दि. २१) पहाटे दोनच्या सुमारास बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याची घटना घडली आहे.
मानव वस्तीत कुत्र्याची शिकार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वन विभागाच्या वतीने नागरिकांनी पशुधन व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खारोळी नदीच्या तीरावर बाळासाहेब सयाजी पाटोळे हे वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरासमोर बांधलेल्या जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्याची बिबट्याने शिकार केली. या वेळी पाटोळे जागे झाल्याने बिबट्याने पळ काढला.
वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल कृष्णा हिरे, वनरक्षक मनेष जाधव, वन कर्मचारी संजय सरोदे यांच्यासह सरपंच बाजीराव आवारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
ठसे पाहिल्यानंतर सदर हल्ला बिबट्याचाच असल्याचे वन विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या वेळी वन विभागाच्या वतीने परिसरात जनजागृती करण्यात आली.
जनावरांच्या गळ्यात घंटा बांधणे, गुराख्यांनी तसेच शेतकऱ्यांनी हातात काठी तसेच गळ्यात मफलर, उपरणे घालावे. बिबट्या दिसल्यास त्याची छेड काढू नये. त्याला त्याच्या रस्त्याने जाऊ द्यावे. परिसरात बिबट्यांचा वावर असला तरी मानवावर हल्ल्याची घटना घडलेली नाही, ही समाधानाची बाब आहे.
वन विभागाच्या वतीने परिसरातील घडामोडींवर बारकाईने लक्ष आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांनी केले आहे.