Ahmednagar News : कार्तिक पंधरा दिवसांपासून शाळेत गेलाच नाही त्याने आपल्या मित्रांसोबत फिरण्यात वेळ घालवला. शाळेतून कर्तिकच्या गैरहजेरीबाबत त्याच्या घरी कळवण्यात आले. ही बाब कार्तिकला समजल्याने आता आपल्याला वडील मारतील? या भीतीने घरी न जाता आई काम करत असलेल्या एका हॉस्पिटल येथून थेट नगरच्या रेल्वे स्थानकावरून बिहार रेल्वेने कोपरगावपर्यंत गेला.
गाडीत बिहारी नागरिक मारतील या भीतीने तिथून रेल्वेने पुण्याला गेला. पुण्यात त्याला घर सोडून आलेले आणखी तिघे भेटले. सर्वजण ठरवून पुन्हा कोल्हापूरला गेले. वैभव हा रेल्वेने तिथून मडगांव गोवा या ठिकाणी गेला. त्याठिकाणी नाश्ता करण्यासाठी त्याकडे पैसे नसल्याने हॉटेल मालकाने चौकशी केली. त्यावेळी त्याने अहमदनगर येथून पळून आल्याचे सांगितले.
हॉटेल मालकाने स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी ताब्यात घेत त्याला अपना घर होस्टेल येथे दाखल केले. मात्र हॉस्टेलमधल्या मुलांनी त्याला सांगितले की, खरे नाव सांगितल्यावर ४-५ महिने येथेच थांबवतील पण खोटे नाव सांगितल्यावर २-३ दिवस शोध घेतील व सोडून देतील म्हणून त्याने आपले नाव वैभव बनकर असे सांगितले.
‘अपना घर’ येथे असताना कार्तिक आणि त्याच्या मित्रांना काही विधी संघर्षग्रस्त मित्रांकडून त्रास होत होता, त्यामुळे त्यांनी बाल कल्याण समिती बोर्ड बसल्यावर तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना मातृछाया बालकल्याण आश्रम फोंडा गोवा येथे दाखल करण्यात आले. तेथुन कार्तिक आणि त्याचे ३ मित्र पळाले. कार्तिक दि.९ जानेवारी रोजी दादर रेल्वे स्टेशन मुंबई येथे आला.
दादर पोलिसांनी वैभवला बाल कल्याण समिती मुंबई येथे हजर करून डेव्हिड ससून औद्योगिक शाळा माटुंगा येथे दाखल केले. तो दादर येथे असल्याबाबत कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली. दि.११ जानेवारी रोजी पत्रव्यवहार करून कोतवाली पोलीस ठाण्यात आणले. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी त्याला पेढे भरवून त्याचे स्वागत केले. कार्तिक ने पुन्हा असे कधीच वागणार नाही अशी ग्वाही दिली.
मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस उपनिरीक्षक अश्विनी मोरे, पोलिस जवान संदीप पितळे, योगेश भिंगारदिवे, सलीम शेख, अमोल गाडे, यांचे सोबतच मुलाचे आई वडील यांनीही प्रयत्न केले होते.