शेवगाव तालुक्यातील जवळपास १० ते १२ गावांना वरदान ठणाऱ्या पैठण उजवा कालव्यातून बुधवार (दि. १६) रोजी कालवा समितीने ठरवून दिलेले चालू हंगामातील दुसरे आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जायकवाडी पैठण धरणाची निर्मिती होताना शेवगाव तालुक्यातील असंख्य गावांना विस्थापित व्हावे लागले असून तालुक्यातील शेकडो हेक्टर जमिनीचे काळे भोर क्षेत्र धरणामध्ये गेले असून सुद्धा व शेवगाव तालुक्याच्या हाकेच्या अंतरावर धरण असताना त्याचा शेवगाव तालुक्याला त्याचा पाहिजे असा फायदा होत नाही.
पैठण धरणातून निघालेला उजवा कालवा १३२ किमीच्या अंतराने माजलगाव धरणात नेऊन तिथेच झिरो करण्यात आला आहे. एकूण ७४ वितरिकेद्वारे टेल पर्यंतचे जमिनीचे क्षेत्र ओलिताखाली येत असून या ७४ वितरिकेच्या खाली अनेक पोट वितरिका आहेत.
सध्या सर्वच्या सर्व वितरिकांची अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात फूट, तूट झाल्याने असंख्य शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. काल शुक्रवार दि. १७ रोजी पर्यंत धरणात ८५. ४३ टक्के एवढा पाणीसाठा असून चालू हंगामात कालवा समितीच्या बैठकीमध्ये ठरलेल्या आवर्तनामध्ये ६ जानेवारी रोजी दुसरे आवर्तन सुटणार ही तारीख निश्चित असताना कालव्याचे मोठी कामे सुरू असल्याने १० दिवस उशिराने कालव्यात पाणी सुटले आहे.
सुटलेल्या या पाण्याचा शेवगाव तालुक्यातील खडके, मडके, खांमपिपंरी, पिंगेवाडी, लाखमापुरी, प्रभुवडगाव, सोनविहीर, हातगाव, मुंगी, कांबी व बोधेगाव या गावांना मोठा फायदा होत असून सध्या अनेक शेतकऱ्यांनी गहू पिकांची मोठ्या प्रमाणात कालव्याच्या पाण्याच्या भरोशावर पेरणी केली आहे.