Ahmednagar News : श्रीरामपूर येथील श्रीहरी पाटील यांची अॅम्ब्युलन्स घेऊन व्यवहार पूर्ण न करता अधिक रक्कम घेऊन फसवणूक करणाऱ्या आळेफाटा येथील राहुल हंडे यांच्यावर तपास करून गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. मोरे यांनी श्रीरामपूर शहर पोलिसांना दिले आहेत.
या खटल्याबाबत सविस्तर माहिती अशी, की पाटील यांनी त्यांच्या स्वमालकीची कार्डिअॅक अॅम्ब्युलन्स आर्थिक अडचणीमुळे आळेफाटा येथील राहुल हंडे यांना १३ लाख ८५ हजारांना विकली होती.
अॅम्ब्युलन्स नेताना हंडे यांनी ३ लाख रुपये रोख व ८० हजार रुपये ऑनलाईन दिले. उर्वरित रक्कम एक महिन्याच्या आत देण्याचे ठरले. एक महिना झाल्यावर पाटील हंडे यांच्याकडे उर्वरित पैसे मागण्याकरीता गेले असता हंडे यांनी गुंडांमार्फत धमकावले.
उर्वरित पैसे दिले नाही, तसेच अॅम्ब्युलन्सही परत दिली नाही. त्यानंतर अॅम्ब्युलन्स परत मिळविण्यासाठी पाटील यांनी हंडे यांना घेतलेले ३ लाख ८० हजार व अधिक ५० हजार रुपये परत केले.
तरीही हंडे यांनी अॅम्ब्युलन्स परत दिली नाही. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करूनही गुन्हा दाखल न झाल्याने पाटील यांनी कोर्टात धाव घेतली. या प्रकरणाची सुनावणी प्रथम वर्ग न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. मोरे यांच्या समोर झाली.
या सुनावणीत पाटील यांचे वकील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी सादर केलेली कागदपत्रे व युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश मोरे यांनी हंडे यांच्यावर तपास करून गुन्हा दाखल करण्याबाबत श्रीरामपूर शहर पोलिसांना आदेश दिले. अॅड. वानखेडे यांना अॅड. अण्णासाहेब मोहन यांनी सहकार्य केले.