अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र मिळवून बढती मिळवून विविध सवलतीचा लाभ घेणार्या शिक्षकांवर गुन्हे दाखल करा. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने करण्यात आली आहे.
या प्रकरणी चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर यांना निवेदन देण्यात आले. जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात झालेल्या खात्या अंतर्गत बढतीमध्ये ३९ अपंग शिक्षकांना बढती मिळाली आहे.

त्यामध्ये अल्प दृष्टी, कर्णबधीर व अस्थिव्यंग आहेत. या अपंगांना बढती देताना जिल्हा परिषदेने कोणतीही खातरजमा न करता, अपंगत्वाची पहाणी न करता सरसकट बढती दिली आहे.
या अपंगांमध्ये काही खोटे अपंग आहेत. काही अपंग हे शारीरिक दृष्ट्या सदृढ असून, त्यांच्याकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे.
खोटे प्रमाणपत्र मिळवून अपंगांच्या सवलती घेणार्यांमुळे खऱ्या अपंगांवर अन्याय होत आहे. या प्रकरणी चौकशी करुन या खोट्या अपंगांचा शोध घ्यावा.
प्रत्येक लाभार्थींची पुन्हा शारीरिक तपासणी करुन नव्याने प्रमाणपत्र द्यावे, यामध्ये सदृढ असून देखील अपंग प्रमाणत्र घेतलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आरपीआयने केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम