Dhangar Reservation : अहमदनगर धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी चौंडी अहमदनगर येथे उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनर व सुरेश बंडगर यांची मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही दिली.
त्यानंतर रुपनर व बंडगर यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे, माजी आमदार अण्णासाहेब डांगे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अण्णासाहेब बाचकर, बाळासाहेब दोडतले आदी उपस्थित होते.

महाजन म्हणाले की, धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नासंदर्भात २१ सप्टेंबर रोजी यशवंत सेनेच्या प्रतिनिधींसमवेत मुंबईत सविस्तर बैठक झाली. धनगर समाजाची आरक्षणाची मागणी न्याय्य असून, सरकारने एकमताने या मागणीला पाठिंबा दिला.
आरक्षणाबाबत काही तांत्रिक अडचणी आहेत, तर काही बाबी न्यायप्रविष्ठ आहेत. त्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देत तांत्रिक अडचणींची ५० दिवसांमध्ये सोडवणूक करण्यासाठी शासनाकडून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विनंतीला मान देत गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सोडले आहे. धनगर समाजाला शाश्वत आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक असून, सर्व समाज बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचेही ते म्हणाले.
विखे पिता-पुत्रा विरोधात घोषणाबाजी
मंत्री गिरिश महाजन हे चौंडी येथील उपोषणास्थळी दुपारी दाखल झाले. यावेळी दोन तास फोनवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा सुरु असतानाच उपस्थित धनगर बांधवांनी आक्रमक होत उपोषणाकडे पाठ फिरवल्याने खा. सुजय विखे पाटील व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात घोषणा देऊन निषेध केला. यावेळी सरकारच्या विरोधात देखील घोषणा देत धनगर बांधवांनी आरक्षणाची मागणी केली.
आंदोलनादरम्यान समाज बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील. तसेच आरक्षणासंदर्भात अभ्यास करण्यासाठी आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येईल. धनगर समाजासाठी असलेल्या विविध योजना, सोयी- सवलतींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचेही मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी नमूद केले