अखेर मढीत ‘त्या’ व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब : १२७ विरुद्ध ३२७ मतांनी ठराव पास

Published on -

अहिल्यानगर : मढीतील कानिफनाथांच्या यात्रेतबाहेरगावातील अवैध व्यवसाय करणारे व नाथांच्या रुढी व परंपरा न पाळणाऱ्या व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा निर्णय मढीच्या ग्रामसभेत बुधवारी (दि.१२) रोजी १२७ विरुद्ध ३२७ मतांनी घेण्यात आला. हिंदू-मुस्लिम युवकांमधील किरकोळ बाचाबाची वगळता पोलिसांच्या सहकार्याने ग्रामसभा शांततेत पार पडली.

मढीच्या मुस्लिमांना आमचा विरोध नाही. दुसऱ्याचा बाप मेला तर तुम्ही कशाला दाढी- मिशा काढता. आम्ही देवाचा प्रसाद दिला तर तुम्ही खात नाहीत, आमच्या देवाचा प्रसाद खाणार नसाल तर विकता तरी कशाला. लेकी -बाळींची छेडछाड, सोरट जुगार, यांसह अन्य जुगार, मांस विक्री, पशुहत्या करता. जाती-जातीत भांडणे लावणारे, रुढी परंपरा न पाळणाऱ्यांविषयी ग्रामसभा आयोजित झाली आहे. यावर ग्रामस्थांचा निर्णय घ्यायचा आहे. रूढीपरंपरा न पाळणाऱ्यांविरुद्ध बहुमताने ग्रामसभेत ठराव संमत झाला. ठरावाच्या समर्थकांनी जय श्रीराम, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत काही तरुणांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

सरपंच संजय मरकड यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. मुख्य प्रस्तावावरच चर्चा करा, असे आवाहन वारंवार करत प्रभारी ग्रामविकास अधिकारी गणेश ढाकणे यांनी वादग्रस्त विषयावरील चर्चा थांबवत तणाव रोखला. शिवरात्र, एकादशीच्या दिवशी मटण खाऊन आमच्या दारात हाडे टाकता, या आरोपाने बैठकीचा नूर पूर्ण पालटला. उपस्थित बहुसंख्य हिंदू बांधवांमध्ये श्रद्धेची भावना वाढून जे ग्रामस्थ राजकीय दृष्ट्या सरपंचांच्या गटाचे नाहीत, त्यांनी सुद्धा सहानभूती दाखवत मतदान केल्याने प्रस्तावाच्या बाजूने मतदानाची आकडेवारी वाढली. गावच्या इतिहासात प्रथमच ग्रामसभेसाठी मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूंच्या महिलांची संख्या लक्षणीय होती. आजच्या ठराव काय होतो, याकडे राज्याचे लक्ष लागले होते.

मढी येथे २२ फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर मोठे वांदग उभे राहिले होते. ॲड. प्रतापराव ढाकणे यांनी मढीच्या ग्रामसभेतील ‘त्या’ ठरावाच्या विरोधात छत्रपती संभाजी नगरच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठात कार्यकर्त्यांमार्फत याचिका दाखल केली होती. तेथे या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय झालेला आहे. २२ रोजीची मढीची ग्रामसभा गटविकास अधिकारी पंचायत समिती पाथर्डी यांनी रद्द ठरविण्याचा निर्णय घेतला होता. मढीच्या ग्रामस्थांनी बुधवारी पुन्हा ग्रामसभा घेतली. सरपंच संजय मरकड यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.

या वेळी मढी गावच्या व कानिफनाथांच्यारुढी व परंपरा पाळणाऱ्या व न पाळणाऱ्या लोकांवर चर्चा झाली. तणावपूर्ण वातावरण, शाब्दिक चकमकी, परस्परांच्या अंगावर धावून जाण्याच्या प्रकाराने अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाथर्डी पोलिसांनी संतप्त ग्रामस्थांवर नियंत्रण मिळवत शांतता प्रस्थापित केली. ग्रामसभेनंतर मात्र मढी, पाथर्डी, तिसगाव या ठिकाणी तणाव सदृश परिस्थिती वाढली. स्थानिक व्यापाऱ्यासह याच भागातील व्यावसायिकांची मढीमध्ये गर्दी असते.

दरम्यान आजच्या ठराव काय होतो, याकडे राज्याचे लक्ष लागले होते. मंत्री नितेश राणे व अन्य संत- महंत, आ. संग्राम जगताप यांनी जाहीर सभेत भाषण करून ठरावाच्या बाजूने पाठिंबा दर्शविला होता. पाथर्डीच्या शांतता समितीच्या बैठकीतही प्रशासनाने इशारा देत जातीय व धार्मिक तणाव वाढून यात्रेमध्ये अडथळा झाल्यास कारवाईचा इशारा दिला होता. याच सभेत हिंदूंच्या वतीने बाहेरच्यांना बंदी घालणार तर मुस्लिम समाजाच्या वतीने पूर्वीच्या परंपरा पळत आम्हाला यात्रेत परवानगी द्या, असे म्हणत न्यायालयाचे दारही ठोठावले. संतप्त वातावरण पाहता स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झाली. अखेर बाहेरच्या व्यापाऱ्यांना बंदी या विषयावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे सरपंच संजय मरकड म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe