अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर-बीड-परळी रेल्वेमार्गावरील नगर ते आष्टी या काम पूर्ण झालेल्या मार्गावर ७ मे पासून रेल्वे धावणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईत दिली आहे.
या रेल्वे मार्गावरील आष्टीपर्यंतचे पूर्ण काम झाले आहे. आष्टी सोलापूरवाडी आणि नारायणडोह ही तीन स्थानके तयार असून गाडीची चाचणी घेण्यात आली आहे. यावरून प्रत्यक्ष गाडी केव्हा सुरू होणार याचीच प्रतीक्षा होती.
७ मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमास राज्यमंत्री दानवे, बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे, नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. नगर ते आष्टी या ६१ किलोमीटर अंतरावर लोहमार्गाचे काम ही पूर्ण झालेले आहे.
त्यावर हायस्पीड रेल्वेची यापूर्वीच चाचणी झाली आहे. उद्घाटनाच्या तारखांची अनेकदा चर्चा झाली. मात्र, अनेक दिवसांपासून हे काम रखडले होते.
आता स्वत: केंद्रीय राज्यमंत्र्यांनीच तारीख जाहीर केली असल्याने नगर आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.