Ahmednagar News : अखेर मनपा पदाधिकारी, नगरसेवकांचा कार्यकाळ २७ डिसेंबर रोजी संपुष्टात आला असून, २८ डिसेंबरपासून प्रशासकाच्या हाती कारभार गेला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांच्या नुसार
कार्यालयीन आदेश सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे यांनी हा आदेश काढला आहे. आता मनपावर प्रशासक कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनपाची सार्वत्रिक निवडणुक डिसेंबर २०२३ मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाबाबतचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदा, महापालिका, नगर परिषदा यांच्या निवडणुका गेल्या २ वर्षांपासून रखडलेल्या आहेत.
राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांवर यापूर्वीच प्रशासकराज आलेले आहे. मात्र राज्यातील नगर व धुळे मनपाच्या कार्यकारी मंडळांची मुदत डिसेंबर अखेर असल्याने तेथे कार्यकारी मंडळ कार्यरत होते. प्रशासकामुळे शेवटची होणारी स्थायी व सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. २९) आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही सभांमध्ये अनेक महत्त्वाचे विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आलेले होते.
मात्र, तत्पूर्वीच बुधवारी (दि. २७) राज्य निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांच्या नुसार सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे यांनी मनपाची मुदत संपत असल्याने पदाधिकारी यांना यापुढील कालावधीत कुठल्याही प्रकारची सभा, बैठक घेता येणार नाही, असे आदेशाद्वारे स्पष्ट केले.
प्रशासक कोण?
मनपाच्या कार्यकारी मंडळाची मुदत संपुष्टात आल्याने कार्यालयीन कामकाजाबाबत त्यांचे असलेले अधिकारही संपुष्टात आले आहेत. त्यामुळे मनपाचा कारभार प्रशासकाच्या हाती गेला आहे. मात्र प्रशासक कोण ? याचा निर्णय अद्याप शासनाने घेतला नसल्याने याबाबत उत्सुकता आहे.