राहुरी शहरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना ही अत्यंत निंदनीय घटना आहे. या कृत्याचा तीव्र निषेध करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
ही घटना घडल्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून संपूर्ण माहिती घेतली आणि या प्रकरणातील आरोपींना शोधून कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

या घटनेने संपूर्ण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, हे लक्षात घेऊन आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी तातडीने राहुरीत येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक नागरिकांच्या संतापाला समजून घेतलं असून, त्यांच्या भावनांचा आदर करत सरकार या प्रकरणात गंभीर आहे, असं विखे पाटील यांनी सांगितलं.
त्यांनी स्पष्ट केलं की, आरोपींना कोणत्याही परिस्थितीत माफ केलं जाणार नाही. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची संख्या वाढवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. भविष्यात जिल्ह्यात असं कृत्य पुन्हा घडू नये, यासाठी कठोर पावलं उचलली जातील, असंही ते म्हणाले.
या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आणि सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या भावनांची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. तरीही, परिस्थिती नियंत्रणात राहावी आणि शांतता कायम राहावी, यासाठी नागरिकांनी संयम ठेवावा, असं आवाहन विखे पाटील यांनी केलं.
ही घटना समाजाला हादरवून टाकणारी असली, तरी पोलिसांना तपासात पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं आहे आणि लवकरच दोषींवर कारवाई होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.