अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव: महिन्याभरानंतरही सर्वकाही अस्पष्ट

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :-  जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागण्याच्या दुर्घटनेस आज महिना झाला आहे. मात्र महिनाभरानंतरही रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची परिस्थिती आहे, तशीच आहे.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या चौकशी समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केला. मात्र आगीचे कारण काय, त्रुटी कोणत्या?, हा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला की, नाही? हे देखील स्पष्ट झालेले नाही.

दिवाळीत ६ नोव्हेंबरला जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात आग लागून एकूण १४ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली. आरोग्य विभागाने ६ जणांना निलंबित केले.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आल्याची हरकत घेत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संप केला. विभागीय आयुक्तांच्या चौकशी समितीने राज्य सरकारला अहवालही सादर केला.

जळालेला अतिदक्षता विभाग पुन्हा सुरू झालेला नाही, वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे बंद पडलेला प्राणवायू निर्मितीचा प्रकल्पही सुरू नाही.

महिन्याभरानंतरही परिस्थितीत कोणतीच सुधारणा नाही आणि राज्य सरकारने दखल देखील घेतलेली नाही. जिल्हा रुग्णालयातील हा अतिदक्षता विभाग बंदच आहे.

जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या घटत असली तरी ‘ओमायक्रॉन’चा धोका कायम आहे. त्यातच हा अतिदक्षता विभाग जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णांसाठीचा एकमेव होता.

त्यामुळे अतिदक्षता विभाग अद्यावत होणे गरजेचे आहे. आगीच्या दुर्घटनेनंतर खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत सुरू झालेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या निधीतून उभारलेला प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प महिनाभरापासून बंद आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe