अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Ahmednagar News :- सध्या उन्हाळ्याचे दिवस असून मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच प्रचंड तीव्र उष्णता वाढली आहे. या दरम्यानच्या काळात अpनेक ठिकाणी जंगलास आग लागण्याच्या घटनांत वाढ झाली आहे.
मात्र पाथर्डी तालुक्यात वाढलेल्या तापमानामुळे एका घराला आग लागण्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी शहरातील हनुमान मंदिराच्या पाठीमागील बाजूस अशोक कटके हे राहतात.

कटके कुटुंब शेतकरी असून ते पत्र्याच्या एका छोट्याशा शेडमध्ये राहतात. नेहमीप्रमाणे ते शेतत तर घरातील महिला मजुरीसाठी गेल्या होत्या.
त्यावेळी दुपारी अचानक घरामध्ये आगीचा भडका उडाला अन् काही क्षणातच या आगीने रौद्ररूप घेतल्याने यात घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य खाक झाले.
ही आग कशामुळे लागली हे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने व दहा बारा दिवसापासुन तीव्र उष्णता असल्यामुळेच आग लागली असल्याचे घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये चर्चा होती.
सुदैवाने आगीमध्ये कुठलीही जिवीतहानी झाली नाही. मात्र रोख रक्कम व मौल्यवान ऐवज जळुन गेल्याने या कुटुंबाचे मोठे आर्थीक नुकसान झाले आहे.