Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील प्रसाद शुगर अँड अलाईड अॅग्रो प्रॉडक्ट्स लि. या साखर कारखान्याने या वर्षी गळितास आलेल्या कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील उसासाठी विनाकपात
पहिली उचल २७०० प्रमाणे बँकेत वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक माजी खासदार प्रसाद तनपुरे, अध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे व कार्यकारी संचालक सुशिलकुमार देशमुख यांनी दिली आहे.
याबाबत पत्रकात आमदार तनपुरे यांनी म्हटले, की यावर्षी गळितास ऊस पुरविणाऱ्या सर्व ऊस उत्पादकांना इतर कारखाने जो अंतिम दर देतील, त्याप्रमाणे अंतिम ऊस दर देण्याचे जाहीर केलेले असुन त्याचे काटेकोर पालन करणार असल्याची हमी कारखाना व्यवस्थापनाने दिली आहे.
या गळीत हंगामामधील पहिल्या पंधरवाड्याचे पेमंट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहे. तसेच ऊस उत्पादकांनी ऊस दिल्यापासुन पंधरा दिवसांच्या आत पेमेंट उत्पादकांच्या खात्यांवर वर्ग करण्याचे नियोजन केलेले आहे.
त्यामुळे ऊस उत्पादकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन प्रसाद शुगरकडे ऊस उत्पादकांचा ऊस देण्याचा ओढा वाढत आहे. कारखाना व्यवस्थापनाने चालु गळीत हंगामात ५.५० लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उदिदष्ट ठेवले आहे.
सध्या कारखान्यास ऊसाचा चांगला पुरवठा चालु असुन असाच पुरवठा पुढेही चालु ठेवण्याचे अवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम देण्याचा प्रसाद शुगर ने नेहमीच प्रयत्न केलेला आहे.
भविष्यात स्पर्धेच्या युगात स्पर्धात्मक ऊस दर देण्यासाठी कारखाना व्यवस्थापन कटिबध्द आहे. कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांनी चुकीच्या व खोट्या भुलथापांना व इतरांचे तात्पुरत्या अमिषाला बळी न पडता विश्वासाने या वर्षी व पुढेही प्रसाद शुगरला जास्तित जास्त ऊस पुरवठा करुन जादा भावाचा, पारदर्शी व्यावहाराचा व विश्वासाचा फायदा घ्यावा, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केलेले आहे.