आधी नियमित व पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करा नंतरच पाणीपट्टी दरवाढ करा : अॅड. आगरकर

Sushant Kulkarni
Published:

१५ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी नगरकरांना पाणी पुरवठ्यासाठी होणाऱ्या खर्चात वाढ झाल्याने पाणी पट्टीत दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.सदर प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महासभेत ठेवण्यात येणार आहे.

लोकनियुक्त सभागृह नसताना आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयाला राजकीय पक्षांकडून विरोध सुरू झाला आहे.भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी महापालिकेच्या पाणी वितरण नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत पाणी पट्टी वाढीस विरोध केला आहे.सदर दरवाढ अन्यायकारक असून प्रशासनाने आधी नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करावा आणि नंतर टप्प्याटप्प्याने दरवाढ करावी अशी मागणी अॅड. आगरकर यांनी केली आहे.

अॅड. आगरकर यांनी म्हटले आहे की, मनपा आयुक्तांनी पाणी पट्टी १५०० रूपयांवरून थेट ३००० रूपये करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.ही दरवाढ सामान्य जनतेसाठी अन्यायकारक आहे.मुळात नगर शहरात अनेक भागात दिवसाआड तर काही भागात आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होतो.

एक तासभर पाणी सोडले जाते.तेवढ्या वेळेत नागरिकांना आठवडाभर पुरेल इतके पाणी मिळत नाही.सरकारच्या योजनेतून फेज टू पाणी योजना राबविण्यात आली.तिचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते.या योजनेतून नळ जोडणीसाठी नागरिकांकडून मोठी रक्कम घेण्यात आली.प्रत्यक्षात पैसे देऊन फेज टूची जोडणी घेतली तरी नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही.

अमृत योजना राबवून थेट मुळा धरणापासून पाणी योजनेचे सक्षमीकरण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला.परंतु ही योजना पूर्णतः अपयशी ठरली आहे ही वस्तुस्थिती आहे. कोट्यवधी रुपये खर्च झाला तरी पाणी पुरवठा नियमित झालेला नाही.हे मनपा प्रशासनासाठी पूर्णतः नामुष्कीची गोष्ट आहे.

२४ किलोमीटर अंतरावरून पाणी आणताना वीज बिल तसेच इतर खर्च वाढतो हे खरच आहे.पण एवढा खर्च होऊनही पुरेशा दाबाने पाणी मिळत नसेल तर नागरिकांनी पाणी पट्टी वाढ का सहन करावी ? हा खरा प्रश्न आहे.

काळानुरूप पाणी पुरवठा करताना खर्च वाढणे साहजिकच आहे.परंतु या वाढत्या खर्चाप्रमाणे सुविधाही वाढणे आवश्यक आहे.दुर्दैवाने नगर शहरात पाणी पुरवठा नियमित होत नाही. अनेकदा दुरूस्तीचे कारणांमुळे पाणी पुरवठा खंडित होतो.याही परिस्थितीत सहनशील प्रामाणिक नगरकर गैरसोय असूनही नियमित पाणीपट्टी भरतात.

त्याबदल्यात त्यांना नियमित पाणी देण्यातही मनपा प्रशासन अपयशी ठरत आहे.अशा वेळी पाणीपट्टी दरवाढ आवश्यक असली तरी त्याचे समर्थन करता येणार नाही.महानगरपालिकेने आधी नियमित व पुरेशा दाबाने सर्वांना समान पाणीवाटप होईल यादृष्टीने पाऊल उचलली पाहिजेत.

समान पाणी आणि समान पाणीपट्टी हेच अपेक्षित आहे.मनपा हद्दीतील सर्व भागात समान आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा केल्यानंतर मनपाने पाणी पट्टी दरवाढ टप्प्याटप्याने करावी. सध्या महानगरपालिकेत लोकनियुक्त प्रतिनिधी नाहीत.त्यामुळे सर्वसामान्यांचा आवाज प्रशासनासमोर मांडण्यात अडचणी आहेत. प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन आताच दरवाढ न करता भविष्यात येणाऱ्या जनप्रतिनिधींशी चर्चा करून सदर दरवाढीचा निर्णय घ्यावा असे आगरकर यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe