बेलवंडी- श्रीगोंदा आणि शिरूर तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या घोड जलाशयात काही लोकांनी विषारी औषधे आणि केमिकल टाकून मासेमारी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या गंभीर प्रकरणाची तक्रार घोड धरणाचे व्यवस्थापक शांताराम शितोळे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. या तक्रारीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या बेकायदा मासेमारीवर तातडीने कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

शांताराम शितोळे यांनी तक्रारीत काही संशयितांची नावे नमूद केली आहेत. त्यांनी मृत मासे आणि जलाशय परिसरात सापडलेल्या औषध व केमिकलच्या रिकाम्या बाटल्यांचे फोटो पुरावे म्हणून पोलिसांना सादर केले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून स्थानिक लोकांसह काही व्यावसायिक मासेमारी करणारे लोक परवानगी न घेता घोड धरणाच्या पाण्यात विषारी पदार्थ टाकत आहेत. अशा पद्धतीने पकडलेले मासे ते बाजारात विक्रीसाठी नेत असल्याचेही उघड झाले आहे.
हा प्रकार केवळ बेकायदा नाही, तर पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठीही घातक ठरू शकतो.
घोड धरण हे श्रीगोंदा आणि शिरूर तालुक्यांच्या सीमेवर असलेले महत्त्वाचे जलाशय आहे. या धरणाच्या पाण्यावर अनेक गावांचा शेती आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे.
मात्र, अशा बेकायदा मासेमारीमुळे पाण्याची गुणवत्ता धोक्यात येत आहे. विषारी औषधे आणि केमिकल्समुळे पकडलेले मासे खाण्यास अयोग्य आणि मानवी शरीराला हानिकारक आहेत. असे मासे खाल्ल्याने लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
तक्रारीत यावर विशेष भर देण्यात आला असून, अशा मासेमारीमुळे केवळ माणसांनाच नव्हे, तर जलचर प्राणी आणि पक्ष्यांनाही धोका निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीतून आणखी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. पाण्यात विषाचे प्रमाण वाढल्यास भविष्यात शेतीसाठी हे पाणी वापरणेही अशक्य होऊ शकते.
जलाशयातील पर्यावरणाचे संतुलन बिघडून जलचरांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. त्यामुळे व्यवस्थापक शितोळे यांनी पोलिसांना या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे.
अशा अनैसर्गिक आणि बेकायदा पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्यासच हा प्रकार थांबेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. बेलवंडी पोलिसांनी या तक्रारीची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू झाला आहे.