अहिल्यानगर – महानगरपालिका ही शहरातील नागरिकांना सेवा व सुविधा पुरवणारी संस्था आहे. कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून महानगरपालिका नागरिकांना सेवा पुरवते. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील मुख्य दुवा म्हणून कर्मचारी वर्षानुवर्षे कर्तव्य बजावत आहेत. सेवा हीच या कर्मचाऱ्यांची ओळख आहे. कर्तव्यदक्ष राहून नागरिकांना चांगल्या सेवा पुरवून कर्मचाऱ्यांनी त्यांची ओळख जपावी. आजचा दिवस महाराष्ट्राच्या अभिमानाचा तर आहेच, पण जनतेच्या सेवेसाठी घेतलेल्या संकल्पाचा पुनःश्च निर्धार करणारा आहे, असे मत आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र दिनानिमित्त आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या हस्ते महानगरपालिकेत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कामगार दिनानिमित महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत उत्कृष्ट सेवा देणाऱ्या महानगरपालिकेतील पाच कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. संतोष राठोड, चंद्रकांत आडेगोकूल, शेखर बनकर, सुरेखा सुरसे, शेख युनूस या कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक सेवेमुळे नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे कामगार दिनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. अहिल्यानगर महानगरपालिका नागरिकांच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध आहे. सर्व कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी काम करत आहेत. आपली संस्था ही नगरकरांची संस्था आहे, त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे काम करून नागरिकांच्या मनात आपल्या व संस्थेप्रती विश्वास निर्माण करावा, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी यावेळी सांगितले.