Ahmednagar Crime : गाडी थांबवून ठेवली म्हणून तिघांनी पाच जणांना मारहाण करून गाडीने उडवून दिल्याची घटना राहुरी तालुक्यातील तांभेरे शिवारात २२ सप्टेंबर २०२३ रोजी घडली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की प्रसाद चिंतामण उचाडे, वय २२ वर्ष, रा. माळेवाडी, डुकरेवाडी, तांभेरे रोड, सात्रळ, ता. राहुरी याने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. २२ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारच्या सुमारास प्रसाद उचाडे तसेच त्याचे मित्र अमोल संभाजी सरोदे, शंकर मुरलीधर पवार, संदिप विजय वेताळ, शुभम विजय नालकर, केशव सुदाम माळी, ऋषिकेश दतात्रय सरोदे हे जीपमध्ये मातीच्या गोण्या भरुन घेवुन जात होते.
तेव्हा तांभेरे रोडलगत असणाऱ्या पाटावर एक मुलगी निखिल गागरे, रा. तांभेरे ता. राहुरी यांच्या सोबत बोलत होती. त्यावेळी त्यांनी गाडी थांबवली व ऋषिकेश दतात्रय सरोदे यांनी मुलीच्या वडीलांना फोन करून तुमची मुलगी निखिल गागरे यांच्याशी बोलत असल्याचे सांगितले.
त्यानंतर काही वेळाने मुलीचे वडील व त्यांचे कुटुंबिय तेथे आले. त्याचवेळी निखिल गागरे यांचेही आईवडिल तेथे आले. दोघांचे आईवडिल हे एकमेकाशी बोलत असताना तेथे शुभम सांगळे, संकेत खेडेकर, अनिकेत खेडेकर, सर्व रा. तांदुळनेर ता. राहुरी हे मोटारसायकलवरुन तेथे आले आणि ऋषिकेश सरोदे यास दमदाटी करुन म्हणाले की, तु निखिल गागरे याने आणलेली पल्सर मोटारसायकल का थांबवुन ठेवली? असे म्हणून तिघांनी त्यांना हातबुक्याने मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली.
मारहाणीत एकाने ऋषिकेश सरोदे यांच्या अंगठ्याला चावा घेतला. त्यामुळे त्याच्या बोटातून रक्त येवु लागल्याने ते त्याला घेवुन तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला निघाले असता त्यांच्या पाठीमागुन शुभम सांगळे, संकेत खेडेकर, अनिकेत खेडेकर हे त्याच्याकडे असलेल्या चारचाकी गाडीतून प्रचंड वेगाने आले व पाठीमागे असलेल्या ऋषिकेश सरोदे, शंकर पवार व अमोल सरोदे बसलेल्या मोटारसायकलला त्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पाठीमागुन जोराची धडक दिली.
त्यामुळे मोटारसायकवर मागे बसलेला शंकर पवार हा त्या चारचाकी गाडीच्या बोनेटवर उडुन पडला व इतर दोघे रस्त्याच्या कडेला उडुन पडले. त्यानंतर प्रसाद आणि संदिप वेताळ बसलेल्या मोटारसायकलला त्यांनी पाठीमागुन धडक देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रसादने मोटारसायकल रस्त्याच्या खाली घातल्याने ते बचावले. या घटनेतुन सावरुन रस्त्यावर येवुन थांबले असता त्यांनी सदर गाडी थोडया अंतरावर जावुन फिरुन पुन्हा त्यांच्या दिशेने आले.
त्यांना सर्वांना गाडीने उडवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या सर्वांनी त्यावेळी रस्त्याच्या खाली असलेल्या ओढयामध्ये उड्या मारल्याने त्यातुन ते बचावले. त्यावेळी त्यांनी पाहिले की ती गाडी संकेत खेडेकर हा चालवित होता. इतर दोघे गाडीमध्ये पाठीमागच्या सीटवर बसलेले होते.
त्यानंतर त्या ठिकाणी शुभम सांगळे याची आई आली व तिने ऋषिकेश सरोदे यास हाताने मारहाण केली. प्रसाद चिंतामण चाडे यांच्या फिर्यादीवरून शुभम सांगळे, संकेत खेडेकर, अनिकेत खेडेकर, शुभम सांगळे याची आई, सर्व रा. तांदुळनेर, ता. राहुरी यांच्या विरोधात गून्हा दाखल करण्यात आला.