राहाता: शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली नाईट लँडिंग सेवा अखेर सुरू होत आहे. येत्या ३० मार्च २०२५ पासून ही सेवा कार्यान्वित होणार असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे.
पहिल्या टप्प्यात हैदराबाद-शिर्डी विमान रात्री ९:३० वाजता शिर्डी विमानतळावर उतरणार असून, ९:५० वाजता पुन्हा उड्डाण घेणार आहे. आतापर्यंत नाईट लँडिंगच्या केवळ चर्चा होत होत्या,

पण आता प्रत्यक्षात ही सुविधा सुरू होत असल्याने साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या सेवेसाठी बुकिंग सुरू झाले असून, सध्या एकच विमान रात्रीची सेवा देणार आहे.
शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगसाठी आवश्यक सर्व व्यवस्था बऱ्याच दिवसांपासून सज्ज झाल्या होत्या. यापूर्वी केवळ मंत्र्यांची किंवा खास व्यक्तींची विमाने रात्री उतरत होती. आता मात्र साईभक्तांसाठी ही सुविधा खुली होत आहे,
ज्यामुळे त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. रात्रीच्या विमानसेवेसाठी औद्योगिक सुरक्षा जवानांची फौज आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलसाठी आवश्यक कर्मचारीवर्ग लवकरच दाखल होणार आहे. सध्या दिवसभरात आठ विमाने शिर्डी विमानतळावर ये-जा करतात, आणि आता त्यात रात्रीच्या एका विमानाची भर पडणार आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने नाईट लँडिंगसाठी सर्व तयारी पूर्ण करून केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती. फेब्रुवारी २०२३ मध्ये नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) ही परवानगी दिली होती.
त्यानंतर एप्रिल २०२३ मध्ये दिल्लीहून आलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाची पहिली रात्रीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नाईट लँडिंग लवकरच सुरू होईल, अशी घोषणा केली होती.
आता ही घोषणा प्रत्यक्षात येत असून, शिर्डी विमानतळावर एक नवे पर्व सुरू होत आहे. नाईट लँडिंग सुविधेमुळे साईभक्तांना रात्री प्रवास करून पहाटेच्या आरतीला उपस्थित राहणे शक्य होणार आहे.
यामुळे परिसराच्या पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. रात्रीच्या विमानांचे भाडे दिवसाच्या तुलनेत कमी असल्याने भाविकांना आर्थिक फायदाही होणार आहे.
याशिवाय, शिर्डीला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे स्थानिक व्यवसायांना आणि सेवांना अधिक गती मिळेल. ही सुविधा साईभक्तांसाठी एक मोठी सोय ठरणार असून, शिर्डीच्या आध्यात्मिक महत्त्वाला आणखी उजाळा देणारी आहे.