मायंबा गडावर भाविकांचा महापूर: अवघ्या एका मिनिटात तब्बल शंभर भाविकांचे होत असे दर्शन

Published on -

अहिल्यानगर: राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मायंबा येथे मच्छिंद्रनाथांच्या सुगंधी उटणे लेपन विधी व कावड यात्रेनिमित्त राज्याच्या विविध भागातून आलेल्या सात लाख भाविकांनी संजीवन समाधीला जलाभिषेक करत उटणे लावले. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास समाधीची महापूजा व महा वस्त्रांनी समाधी झाकून यात्रोत्सवाची सांगता झाली.

श्रीक्षेत्र मायंबा येथे मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी असून फाल्गुन अमावस्येला येथे कावड यात्रा भरून हजारो भाविक पैठण वरून आणलेल्या गंगाजलाने समाधीला जलाभिषेक घालतात. यंदा दुपारी बारा वाजल्यानंतर जलाभिषेकाला प्रारंभ झाला. नाथांचा जयजयकार करत हजारो भाविक दर्शन रांगेत उभे होते. दुपारी साडेतीन वाजल्यानंतर नाथांच्या संजीवन समाधीला सुगंधी उटणे लावण्यात प्रारंभ झाला.

वर्षातील एकच दिवस समाधीलाथेट हस्त स्पर्श करता येत असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे येतात. यावर्षी उटणे लावण्यासाठी दोन रांगा करण्यात येऊन दर्शन रांगेमध्ये मध्ये घुसता येणार नाही याची पूर्णपणे दक्षता यात्रा संयोजन समितीने घेतली होती. तीन किलोमीटरचे विविध पिंजरे पार करत शॉवरखाली आंघोळ करूनच भाविक आपोआप मंदिरामध्ये जात होता.

एका मिनिटाला सव्वाशे ते दीडशे भाविक मंदिरामधून बाहेर काढले जातील याची दक्षता घेण्यासाठी दोन्ही बाजूंनी दहा, दहा विशेष सेवक तैनात केले होते. गाभाऱ्याच्या प्रारंभीच भाविकाच्या हातामध्ये उटणे देण्यात येऊन ते उटणे भाविक समाधीला लावून काही सेकंदात गाभाऱ्या बाहेर जाईल याची व्यवस्था करण्यात आली. संपूर्ण मंदिर परिसरात अहोरात्र शोभेच्या दारूची आतषबाजी सुरू होती विविध गावच्या भाविकांनी व मंडळांनी प्रचंड प्रमाणावर महाप्रसाद वाटप करत सेवा केली. पाणी, चहा, अल्पोपहार, महाप्रसाद, फलाहार, बिस्किट वाटप सर्वत्र सुरू होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe