पारनेर तालुक्यासाठी येत्या २५ फेब्रुवारीपासून कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सोडा

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : कांदा पिकासाठी पाण्याची आवश्यकता असल्याने पारनेर तालुक्यासाठी येत्या २५ फेब्रुवारीपासून कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सोडण्यात यावे,

अशी मागणी आमदार नीलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मंगळवारी केली.

मराठा आरक्षणासंदर्भात बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनासाठी मुंबईत दाखल झालेल्या आ. लंके यांनी कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची दखल घेउन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या भेटी घेऊन तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी केली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पारनेर तालुक्यातील सर्व पाणीवाटप संस्थांनी जलसंपदा विभागाकडे रब्बी हंगामातील आवर्तन सोडण्याची मागणी केलेली आहे.

सर्व पाणी वाटप संस्थांनी शासन आकारणी करत असलेली पाणीपट्टी शासनाकडे जमा केली असून, या संस्थांकडे कोणत्याही प्रकारची थकबाकी नाही.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, पारनेर तालुक्यातील शेतकरी नगदी पिक म्हणून प्रामुख्याने कांदा पिकाची लागवड करतात.

मध्यंतरी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांद्याच्या रोपांचे नुकसान झाल्याने पुन्हा कांदा पिकाच्या रोपांची निर्मिती करून लागवड करावी लागली.

परिणामी लागवड उशिरा झाल्याने शेतकऱ्यांना पाण्याची तिव्र टंचाई जाणवत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन २५ फेब्रुवारीपासून सुरू करण्यासंदर्भात आपल्या स्तरावरून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात यावे, अशी मागणी आ. लंके यांनी निवेदनात केली आहे. आ. लंके यांच्यासमवेत भाळवणीचे युवक सहकारी बबलू रोहोकले हे होते.

श्रीगोंदे, कर्जत, जामखेड या तालुक्यांना २५ फेब्रुवारी रोजी आवर्तनाची गरज नसेल तर पारनेर तालुक्यासाठी १० दिवसांचे ११० किलोमीटरपर्यंत आवर्तन सोडण्यात यावे अन्यथा सुमारे १ हजार २०० हेक्टरवरील कांद्याचे पिक पाण्याअभावी जळून जाईल, अशी भीती या निवेदनात आ. लंके यांनी वर्तविली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe