अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली अनेक महिने लालपरीची धाव हि रोखण्यात आली होती.
मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी बससेवा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. मात्र जिल्ह्यातील आदिवासी भाग म्हणून परिचित असलेला अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील एस.टी.बससेवा बाबत समस्यां कायम आहे.
अकोले आगारासाठी नविन व चांगल्या प्रकारच्या एस.टी बसेसचा पुरवठा करावा व तालुक्यातील आदिवासी जनतेला न्याय मिळून द्यावा, अशी मागणी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी परिवहन व संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील एस. टी. बससेवा पूर्ववत सुरू केलेबाबत आभार व्यक्त करत अकोले आगारासाठी नवीन बसेस मिळाव्यात अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
अकोले तालुक्यातील अकोले आगार येथे बहुतांशी एस. टी. बसेस जुन्या आहेत. तालुका हा आदिवासी, डोंगराळ व दुर्गम असून खेडोपाड्यांनी विखुरलेला आहे. तालुक्यात बहुतांशी रस्ते हे वळणाचे व चढणाचे आहेत.
सध्या आगारामध्ये जुनेच वाहने आहेत. त्यामुळे संबंधित गावांना जाण्यासाठी वेळेत जाता येत नाहीत. बहुतांशी वाहने रस्त्यातच नादुरुस्त होतात, त्यामुळे आदिवासी भागातील प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम