Ahmadnagar Breaking : राहुरी तालुक्यातील मानोरी शिवारात शनिवारी दुपारी भरदिवसा जबरी चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चोरट्यांच्या मारहाणीत ६५ वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर राहुरी येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोने घेऊन पोबारा केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या महिलेला स्थानिकांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तातडीने तातडीने राहुरीचे पोलीस फौजफाट्यास घटनास्थळी पोहोचून तपासाची चक्रे फिरविण्यात आली आहेत.
राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील गणपतवाडी येथे वस्तीत इंजिनीयर लक्ष्मण रामचंद्र खामकर यांचा बंगला आहे. ते शनिवारी सकाळीच त्यांची पत्नी व मुलीला घेऊन देवीच्या दर्शनासाठी बाहेरगावी गेले होते.
त्यांच्या घरी त्यांची वृद्ध आई सरुबाई रामचंद्र खामकर (वय ६५) एकट्याच असल्याचा फायदा घेत दुपारी एक ते दीड वाजेच्या दरम्यान मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी बंगल्याच्या कंपाउंडमध्ये प्रवेश करत दारावरची बेल वाजवून थेट घरात प्रवेश केला.
वृद्ध सरूबाई खामकर यांना त्यांनी “आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे रिपेअर करायला आलो आहोत, साहेब कुठे आहेत?” असे विचारले. त्यानंतर त्यांच्या तोंडात बोळा कोंबत त्यांच्या डोक्याला गंभीर मारहाण करण्यात आली.
आजी घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. घरात बाथरूम, बेडरूम, बैठक रूमपासून बाहेरपर्यंत सर्वत्र रक्त सांडलेले होते. त्यांच्यावर राहुरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून डोक्याला सुमारे ५० टाके पडले आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते.
घटनास्थळी राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, उपनिरीक्षक पोपट कटारे सहाय्यक फौजदार म्हातारबा जाधव, कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे यांनी भेट देऊन पाहणी केली व तातडीने फॉरेन्सिक लॅब, ठसे तज्ञ, श्वान पथकाला पाचरण करण्यात आले.
श्वान घरातच घुटमळले. घटनास्थळी आरोपींच्या कोणत्याही वस्तू आढळून आल्या नाही. आजीने दिलेल्या माहितीनुसार चोरटे दोघे होते. त्यातील एकाने निळा टी-शर्ट व दुसऱ्याने पिवळा टी-शर्ट घातलेला होता.
दोघेही तरुण होते. गेल्या १३ तारखेपासून बंगल्यातील सीसीटीव्ही बंद होते. आरोपींनी ‘आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यासाठी आलो’, असे म्हटल्याने ते माहितगार असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आरोपींनी तोंडाला कपडे बांधले असल्याने ते ओळखीचे असल्याची शक्यता पोलिसांनाही आहे.