जिल्ह्यात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे आणि त्यामुळे माणूस विरुद्ध बिबट्या असा संघर्षही वाढलाय. राहता, कोपरगाव आणि श्रीरामपूर तालुक्यांमध्ये गेल्या काही वर्षांत अशा घटना वाढल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर वनविभागाने कोपरगाव रेंज मोठी करण्याचा निर्णय घेतलाय.
सध्या कोपरगावात एक कार्यालय आहे, पण आता या रेंजअंतर्गत श्रीरामपूर आणि राहता या दोन्ही तालुक्यांमध्येही कार्यालयं सुरू होणार आहेत. आताच्या घडीला कोपरगावच्या वनक्षेत्रपाल (रेंजर) कार्यालयात फक्त दोन वनपाल आणि सहा वनरक्षक एवढंच माणसांचं बळ आहे.

या आठ जणांवर तीन तालुक्यांची जबाबदारी आहे, त्यामुळे प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागतेय.
शेतात बिबट्यांचा वावर वाढलाय, पाळीव जनावरांवर आणि माणसांवरही हल्ले होत आहेत. त्यामुळे नाशिकहून १०-११ कर्मचाऱ्यांची पदं कोपरगावला आणली जाणार आहेत. वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी कोपरगाव रेंज वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलंय.
या योजनेनुसार वनपालांची संख्या ३ आणि वनरक्षकांची संख्या ९ होणार आहे. श्रीरामपूर आणि राहत्यासाठी आता माणसं उपलब्ध झाली आहेत.
यामुळे पुढे स्थानिक पातळीवर वनक्षेत्र आणि वन्यजीवांशी निगडित प्रश्न सोडवायला चांगलीच मदत होईल, अशी आशा आहे. पण दुसरीकडे, राहता आणि श्रीरामपूर तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्यामुळे लोकांमध्ये रागही वाढतोय.
डोळ्यादेखत बिबटे लहान मुलांना पळवून नेत असल्याने सामान्य माणसांचा प्रशासनावरचा संताप वाढलाय.
राहता तालुक्यात तर बिबट्यांकडून माणसांवर हल्ले सातत्याने होत आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये चितळी परिसरात १६ वर्षाच्या मुलीवर हल्ला झाला, त्यानंतर ममदापुरात दुचाकीवरच्या दोघांवर हल्ला झाला.
तसेच २६ मार्चला धनगरवाडीत ६ वर्षाच्या चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. श्रीरामपूर तालुक्यातही अशा घटना वाढल्यामुळे कोपरगाव रेंज वाढवणं गरजेचं झालं होतं. आता गरज पडेल तिथे पिंजरे लावण्याचं कामही वेगाने होऊ शकेल.