४ फेब्रुवारी २०२५ देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील म्हैसगाव परिसरातील शेतकरी प्रमोद दुधाट यांच्या शेतात असलेल्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला सोमवारी (दि. ३) वनविभागाने सुखरूप बाहेर काढले.रविवारी रात्री भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.शेतकरी दुधाट यांचे वाटेकरी असलेला व्यक्ती सकाळी मोटर सुरु करण्यासाठी गेला असता त्यांना विहिरीत बिबट्या निदर्शनास आला.
त्यांनी सदर घटनेची माहिती शेतकरी दुधाट यांना दिली. त्यांनी त्वरित वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुरुवातीला रस्सीला बाज बांधून विहिरीत खाली सोडली.
त्यानंतर दुसऱ्या बाजूला पिंजराही रस्सीच्या सहाय्याने बाजेच्या समांतर बाजूला सोडला आणि बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केला. यावेळी पिंजऱ्यात कैद झालेला बिबट्या सुखरूप विहिरीतून बाहेर काढण्यात आला. हा बिबट्या अवघ्या पाच ते सहा महिन्यांचा असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पकडलेल्या बिबट्याला बारागाव नांद्र येथील नर्सरीमध्ये नेण्यात आले आहे.म्हैसगाव ग्रामस्थांच्या माहितीनुसार या ठिकाणी बिबट्यांच्या मादीसोबत काही पिल्ले देखील निदर्शनात येत असतात. या परिसरात बिबट्यांची संख्याही वाढलेली आहे. यापूर्वी देखील येथे अनेक बिबटे शेतकऱ्यांना दिसलेले आहेत.
पिंजरा लावा; ग्रामस्थांची मागणी
म्हैसगावसह कोळेवाडी, मायराणी, आग्रेवाडी तसेच गाडकवाडी, ताहाराबाद या ठिकाणीही बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. बहुतांशी शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन घडले आहे. त्यामुळे या गावांमध्ये वनविभागाने तात्काळ पिंजरे लावावेत, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी केली आहे.