राहुरी शहर : विधानसभेतील पराभवानंतर माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत असून, विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. राज्यातील बांधकाम ठेकेदारांच्या थकीत बिलांबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर आवाज उठवला आहे.
राहुरी विधानसभा मतदारसंघात विक्रमी काम करूनही आणि लोकप्रियता असूनही तनपुरे यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यांनी खचून न जाता राहुरी नगर- पाथर्डी मतदारसंघातील समर्थकांसाठी सक्रिय राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी विविध धार्मिक कार्यक्रम आणि लग्न समारंभांना उपस्थिती लावली असून, सार्वजनिक जीवनात सातत्याने सहभाग घेत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध विभागांच्या बांधकामांच्या थकीत देयकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर तनपुरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “सरकारच्या विविध विभागांद्वारे सुरू असलेल्या बांधकामांची सुमारे ८९ हजार कोटी रुपयांची थकबाकी जुलै २०२४ पासून प्रलंबित आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्टेट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने कामे थांबवण्याचा इशारा दिला आहे. ५ फेब्रुवारीपासून विकासकामे ठप्प होण्याचा धोका आहे.”
सरकारवर निशाणा साधताना तनपुरे म्हणाले, “खिशात दिडकी नसताना गतिमान महाराष्ट्राच्या गप्पा मारायच्या, मोठमोठे प्रकल्प जाहीर करायचे, पण अंमलबजावणीसाठी पैसा नाही. सुकाळ योजनांचा बोजा स्वार्थासाठी शासनाच्या तिजोरीवर ओढवला जातोय. विकासकामे बंद होण्याची नामुष्की सरकारवर येते आहे, यातच त्यांचा फोलपणा स्पष्ट होतो.”
ते पुढे म्हणाले, “दावोस वारीचे गोडवे गाणे संपले असतील तर मुख्यमंत्री महोदयांनी आता या गंभीर प्रश्नाकडे विशेष लक्ष द्यावे.” तनपुरे यांच्या या टिकेबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.