१३ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : सारोळा कासार गावातील एकाच वर्गात पहिली ते १२ वि पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या वर्ग मित्रांची एमपीएससी परीक्षेत कामगिरी चमकली.त्यांची आता अधिकारी पदावर निवड झाली आहे.विशेष म्हणजे हे सर्व शेतकऱ्यांची मुले आहेत आणि कुठल्याही महागड्या शिकवण्या न लावता अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सेल्फ स्टडी करून त्यांनी हे यश मिळविले आहे.
संकेत गोरख कळमकर, सुरज बबन कडूस, अमितकुमार मच्छिद्र धामोरे आणि सोनाली बाळासाहेब धामणे अशी त्यांची नावे आहेत.त्यांच्या यशाबद्दल सारोळाकासार गावची शान उंचावली आहे.लोकसेवा आयोगामार्फत सन २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेचा निकाल ११ फेब्रुवारीला जाहीर झाला आहे. यामध्ये या चौघांनी हे यश मिळवले आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Ahmednagarlive-24-News-17.jpg)
यातील संकेत कळमकर यांची महसूल सहाय्यक अधिकारी पदी, सूरज बबन कडूस यांचीही महसूल सहाय्यक अधिकारी पदी, सोनाली बाळासाहेब धामणे हिची मंत्रालय लिपिक पदी तर अमितकुमार धामोरे यांचीही महसूल सहाय्यक अधिकारी पदी निवड झाली आहे.
विशेष म्हणजे अमितकुमार याची काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत ही निवड झालेली आहे.हे सर्वजण इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकलेले आहेत.तर ५ वी ते १२ शिक्षण गावातीलच रयत च्या कर्मवीर विद्यालयात घेतले आहे.
त्यातील तिघांनी नगरच्या न्यू आर्ट्स महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले तर धामोरे याने संगमनेर येथे बी टेक पदवी घेतलेली आहे. एकाच वेळी गावातील चार जणांची एमपीएससी परीक्षेद्वारे अधिकारी पदी निवड झाल्याने गावकऱ्यांनी त्या सर्वांचे प्रत्यक्ष भेटून, फोन करून तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून अभिनंदन केले.