५ फेब्रुवारी २०२५ शेवगाव : पोलिसांनी सात महिन्यांपासून फरार असलेल्या शेअर मार्केट ट्रेडिंग घोटाळ्यातील आरोपीला अटक केली आहे. या आरोपीने निव्वळ शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 1 कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक केली होती.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता आणि त्याचा शोध घेत असलेल्या पोलिसांना अखेर मोठे यश मिळाले. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला गुप्त माहितीच्या आधारे पकडण्यात आले आहे.

शेवगाव पोलिस ठाण्यात 25 जुलै 2024 रोजी तक्रारदार साईनाथ नामदेव भागवत यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले होते की, अनिरुद्ध मुकुंद धस (रा. एरंडगाव भागवत, ता. शेवगाव) याने ‘एडी’ नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग कार्यालय सुरू करून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली.
या प्रकरणात गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला होता. पोलिस त्याचा मागोवा घेत होते, मात्र तो सात महिन्यांपासून सतत ठिकाण बदलत असल्याने शोध घेण्यात अडथळे येत होते.
शेवगाव पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी धस आपल्या शेवगाव येथील घरी आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
पोलिस येत असल्याचे लक्षात येताच आरोपी धस पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, पोलिसांनी शिताफीने पाठलाग करत शेवगावच्या मिरी रोडवरील एका हॉटेलसमोर त्याला अटक केली.
या अटक कारवाईत पोलिस निरीक्षक समाधान नागरे, सहायक पोलिस निरीक्षक अशोक काटे, किशोर काळे, चंद्रकांत कुसारे, संदीप आव्हाड, श्याम गुंजाळ, संतोष वाघ, राहुल खेडकर, प्रशांत आंधळे, संपत खेडकर, मारुती पाखरे, कृष्णा मोरे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे राहुल गुड्डू यांनी मोठी भूमिका बजावली.
शेअर मार्केटच्या नावाखाली मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारे अनेक गुन्हेगार सक्रिय आहेत. पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला असून कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीपूर्वी अधिकृत माहिती घेणे गरजेचे आहे.
या घटनेनंतर शेवगाव परिसरात चर्चेला उधाण आले असून शेअर मार्केट घोटाळ्यांबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.