Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील प्रत्येक गावातुन भाकरी, भाजीसाठी लोकवर्गणी, पाण्याचे बॉक्स, अशी मदत २१ तारखेला मिळावी. प्रत्येक गावातील भाकरी वाहनांमधून आगसखाांड परिसरात आणाव्यात. तेथे आमटीची भाजी करण्यासाठी मसाले व इतर साहित्यही देण्यात यावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी मोटारसायकल व झेंडे सोबत असावेत. संघर्षयोद्धा श्री मनोज पाटील जरांगे हे २० तारखेला मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मुंबई येथे आझाद मैदान येथे मराठा महामोर्चा घेऊन जात आहेत.
हा महामोर्चा पाथर्डी तालुक्यातून जाणार असून, ही आपल्या सर्व बांधवांसाठी एक गौरवपूर्ण व मोठी बाब आहे. हा मोर्चा (दि. २१) सकाळी मिडसांगवी येथे येणार असून, सर्व बांधवांसाठी दुपारच्या जेवणाची व पाण्याची व्यवस्था मराठा समाजावर असणार आहे.
यामध्ये इतर समाजातील बांधवही मदतीला येणार आहेत. मराठा बांधवांनी आपापल्या गावातून प्रत्येक घरातून २०० ते ५०० भाकरी आणाव्यात. यासाठी मराठा बांधवांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा.
भाकरी, चपाती गोळा करुन व भाजीचा किराणा घेऊन आगसखांड फाटा येथे प्रत्येक गावाचे स्टॉल लावून तयारी करायची आहे. यासाठी आपल्या गावाची तात्काळ बैठक घेऊन नियोजन करण्याची गरज आहे.
समाजासाठी सगळे मतभेद विसरुन एकत्र येऊन नियोजन करण्यासाठी समाजाने पुढे येऊन नियोजन करावे. तरुणांना दिलेली जबाबदारी पार पाडावी. गावातील ग्रामस्थांनी २१ तारखेला सकाळी मिडसांगवी येथे संघर्षयोद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या स्वागतासाठी मोटारसायकल रॅलीने पोहचावे,असे आवाहन पाथर्डी तालुका सकल मराठा समाज पाथर्डी शेवगावच्या वतीने करण्यात आले आहे.
पाथर्डीच्या शासकीय विश्रामगृहात समाजबांधवांची बैठक झाली, तेथे संघटितपणे काम करण्याचे सर्वानुमते ठरले आहे. जबाबादारी देण्यापेक्षा ती मनाने स्विकारली की काम चांगले होते, हा अनुभव यावेळी कथन केला आहे.
युवकांनी यामध्ये पुढे रहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. पाथर्डी तालुक्यातील सर्व भागात प्रत्येक गावांतून मदत मिळावी, त्यासाठी काम केले जावे.