अहिल्यानगर : निवडणुकीत निवडून येण्यासाठी अनेक नेते मंडळी सर्वसामान्य नागरिकांना अनेक आश्वासने देतात. तुमच्यासाठी मी सदैव तत्पर असेल असे देखील सांगितले जाते, मात्र निवडणूक झाल्यानंतर त्या नेत्यांना सर्वसामान्य जनतेचा विसर पडलेला दिसून येत असल्याचे आपण पाहत आहोत.
मात्र याला जिल्ह्यातील काही नेते अपवाद ठरले आहेत यातील एक म्हणजे कर्जत- जामखेड मतदारसंघातील नागरिकांचे लाडके ‘रामभाऊ’ म्हणजे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे. त्याचे झाले असे कर्जत तालुक्यातील राशीन येथील जगदंबा दूध डेअरीवर परिसरातील शेतकऱ्यांनी तब्ब्ल दीड लाख लिटर दूधसंकलन केले होते.

दरम्यान या काळात शेतकऱ्यांना शासनाने घोषित केलेले तब्बल ११ कोटींचे अनुदान अद्याप मिळाले नव्हते. दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले जानेवारी २०२४ मधील पाच रुपये प्रतिलिटर प्रमाणे ६ महिन्यांचे अनुदान रखडले होते. जगदंबा डेअरीमार्फत अनुदान मिळण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता देखील करण्यात आली होती.
याबाबत जगताप यांनी पाठपुरावाही केला मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी अनुदान देण्यास मुद्दाम काही कारणास्तव विलंब लावला जात होता. अनेक खासगी डेअरीचालकांना याचे अनुदान मिळाले होते, मात्र जगदंबा दूध डेअरी फार्ममार्फत संकलित दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते.
त्यासाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर जगदंबा डेअरीचे अध्यक्ष नारायण जगताप यांच्या अधिकाऱ्यांचे दुखणे लक्षात आल्यानंतर जगताप यांनी थेट विधानपरिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांना याबाबत माहिती दिली . राम शिंदे यांनी कोणतीही वेळ न घालवता थेट संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला. त्यांच्या स्पष्ट निर्देशानंतर प्रशासनही सक्रिय झाले आणि अवघ्या काही तासांत ८ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. राहिलेली उर्वरित रक्कमही जमा होईल ही खात्री दिली.
मी रामभाऊ बोलतोय..! या एकाच वाक्याने गोरगरीब जनता आणि शेतकरी , सर्वसामान्यांची अडकलेली कामं मार्गी लागतात. त्यामुळे प्रभावी नेतृत्व, गरजूंप्रती तळमळ आणि निर्णयक्षमता यामुळे राम शिंदे हे सर्वांसाठी एक विश्वासार्ह नेते बनले आहे. त्यामुळे ते आजही सर्वसामान्य नागरिकांसाठी ‘रामभाऊ’च आहेत.