Ahmednagar News : नगर विकास विभागाच्या खात्यातून “महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद” या योजनेअंतर्गत अहमदनगर महानगरपालिका करिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्या असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितली.
अहमदनगर महापालिका क्षेत्राचा विकास आता अधिक जलद गतीने होणार आहे. कारण शासनाकडून नागरी मुलभूत सेवा सुविधांसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच महापालिकेला वर्ग केला जाणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून नगर विकास विभागाच्या खात्यातून “महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद” या योजनेअंतर्गत अहमदनगर महानगरपालिका करिता २० कोटी रुपयांच्या अनुदानास शासनाने मंजूरी दिली आहे. यामुळे शहरातील मुलभूत सोई सुविधा उभारण्यासाठी येणारी निधीची समस्या मार्गी लागली असून लवकरच शहरात विविध नागरी कामांना सुरवात केली जाईल असे खासदार विखे म्हणाले.
अहमदनगर महापालिका क्षेत्रात अनेक कामे निधीच्या अभावामुळे रखडली होती. यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत आणि माझ्यामार्फत महापालिकेला नागरी मुलभूत सेवा सुविधांच्या कामासाठी निधी मिळण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागणीला प्रतिसाद देत सदर निधी मंजूर केला आहे.
सदर निधीतून शहरातील रस्ते, जलवाहिन्या, गटारे, सभामंडप आणि इतर विविध नागरी कामे मार्गी लागणार आहेत. यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या कमी होऊन शहराचा विकास साधला जाईल असा आत्मविश्वास खासदार डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
सदर निधीसाठी योग्य तो पाठपुरावा केल्याबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अहमदनगर निवडणूक प्रमुख महेंद्र गंधे आणि प्रिया जानवे व मयुर बोचकुळ यांनी आभार व्यक्त केले.