अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- निळवंडेच्या आवर्तनात वाहून गेलेल्या समीर शांताराम पवार (१४) व ७ वीतील सोहम शांताराम पवार (१२) या भावंडांवर शोकाकुल वातावरणात सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
तालुक्यातील राजूर येथील स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयातील ९ वीतील समीर शांताराम पवार (१४) व ७ वीतील सोहम शांताराम पवार (१२) हे भाऊ रविवारी मुंबईहून आपल्या मामाच्या दशक्रियेसाठी आलेल्या एका ३० वर्षीय नातेवाईकासह दशक्रियाविधी पार पडल्यानंतर रविवारी फिरण्यास निळवंडे धरण परिसरात आले.

हे भावंड नातेवाईकांसह फिरत फिरत निळवंडे धरणाच्या भिंतीतून जेथून खालील बाजूस प्रवरा नदीपात्रात हे आवर्तन सोडण्यात येते तेथे आले. पाणी पाहून त्यांना आंघोळ करण्याचा मोह आवरता आला नाही.
प्रवरा नदीपात्रात पाण्याचा प्रवाह प्रति सेकंद १३०० क्युसेक्सने सुरू असल्याने हे दोन्ही भाऊ हातात हात घेऊन जसे पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करतात तोच पाण्याच्या वेगवान प्रवाहात ते वाहून गेले.
सोबतच्या नातेवाईकास ते दिसत नसल्याने ते घाबरून शोध घेऊ लागले. पण त्यांना मुले कोठे आहेत याचा अंदाजच येईना. ही वार्ता राजूर येथे मुलांच्या घरी समजल्यावर निळवंडे धरणाकडे मदतकार्यासाठी इतर नागरिकांनीही धाव घेतली.
स्थानिक पातळीवर काही गोताखोरांच्या मदतीने शोध घेऊन रविवारी रात्री समीर व सोमवारी (२९ नोव्हेंबर) सकाळी सोहम यांचे पार्थिव प्रवरा नदीपात्रात मिळून आले. राजूर येथे दोन्ही भावंडांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात सोमवारी अंतिम संस्कार करण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













