Ahmednagar News:मनमाड महामार्गाच्या प्रश्नावर भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यात अनेकदा आरोपप्रात्यारोप झाले आहेत.
आता तनपुरे यांचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी याच उडी घेतली आहे. मात्र, त्यांनी विखे यांना नव्हे तर थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाच यात लक्ष घालण्याचे आवाहन केले आङे. त्यासाठी तनपुरे यांनी गडकरी यांना जेवणाचे निमंत्रण दिले आहे.
मात्र, एक अट घालण्यात आली आहे ती म्हणजे गडकरी यांनी स्वतःच्या खाजगी वाहनाने कोपरगाव ते नगर हा प्रवास करून राहुरी येथे तनपुरे यांच्या निवासस्थानी यावे.
नगर-मनमाड महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी तनपुरे यांनी अशा पद्धतीने निमंत्रण दिले आहे. नगर जिल्ह्यातून जाणाऱ्या नगर-मनमाड या रस्त्याचे काम मध्येच बंद पडले आहे.
त्यामुळे हा रस्ता अत्यंत खराब झाला असून अपघात आणि त्यामध्ये होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढली आहे. राहुरीपासून कोपरगावपर्यंतचा भाग तर खूपच खराब झाला आहे.
यासंबंधी राहुरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी तनपुरे यांनी मंत्री गडकरी यांना अशा पद्धतीने निमंत्रण देत असल्याचे जाहीर केले.