अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Lemon prices :- मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच वाढलेला उन्हाचा प्रचंड चटका. त्यामुळे स्थानिक बाजारातच वाढलेली मोठी मागणी आणि त्यापाठोपाठ परराज्यातून मंदावलेली आवक यामुळे लिंबाचे दर चांगलेच वधारले आहेत.
कधी नव्हे ते सध्या सफरचंदापेक्षाही महागड्या दराने लिंबू विकले जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाला १५० रूपये प्रतिकिलो तर किरकोळ बाजारात थेट २०० रूपये या प्रमाणे लिंबू विकले जात आहे.
नगर जिल्ह्यात ऊसासह संत्रा, डाळिंब, लिंबू यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.यावर्षी सुरूवातीपासूनच अतिवृष्टी व सतत होणारे हवामान बदलामुळे शेतीवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाले आहेत.
हवामान बदलाने उभी पिके नष्ट झाली तर उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात घटले आहे. निर्सगाच्या या बदलाच्या तडाख्यातून फळबागा देखील सुटल्या नाहीत. ऐन फळ धरण्याच्या वेळीच अतिवृष्टी झाल्याने मोठे नुकसान झाले होते.
तर नंतरच्या बहराच्यावेळी ढगाळ वातावरणामुळे मोठी फळगळती झाली होती. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येत असल्याने भाववाढ झाली आहे.
दरम्यान मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच उन्हाचा चटका प्रचंड वाढला असून दिवसेंदिवस तो वाढतच आहे.वाढत्या उन्हापासून बचावासाठी नागरिक थंड पेयाचा आधार घेतात.
घटलेले उत्पादन व वाढलेली मागणी यामुळे लिंबाचे दर वाढले आहेत.तसेच कमी पाण्यावर व कमी मेहनतीत येणारे फळ म्हणून लिंबाला शेतकरी पसंती देत आहेत.सध्या मात्र लिंबू उत्पादक शेतकऱ्याच्या हातात दोन रूपये मिळत असल्याने लिंबू उत्पादकांना अच्छे दिन आले आहेत.