भंडारदऱ्यात जाताय ? पोलिसांकडुन आली ही महत्वाची सूचना

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अतिमहत्वाच्या समजल्या जाणाऱ्या भंडारदरा पर्यटनस्थळावर पर्यटक हुल्लडबाजी करत जीवघेण्या पद्धतीने सेल्फी काढत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पर्यटकांनी कोणत्याही धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढु नये, असे राजूर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा हे अतिमहत्वाचे निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या पर्यटन स्थळावर पाऊस पुन्हा दाखल झाला आहे. त्यातच भंडारदरा हे ब्रिटीशकालीन धरण पूर्ण क्षमतेने मंगळवारी ओसंडुन वाहू लागले.

भंडारदऱ्याच्या सांडव्यातूनही सात हजार क्युसेकच्या आसपास पाणी प्रवरा नदीमध्ये सोडण्यात आले आहे. तसेच भंडारदरा धरणाच्या परीसरात डोंगराच्या काळ्या कातळावरुन जोरदार धबधब्यांची मालिकाच सुरु झाली आहे.

त्यामुळे वीक एंडचे औचित्य साधत भंडारदऱ्याला मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली होती. धरणाच्या सांडव्याच्या परिसरात पाणी सांडव्यावरुन उसळी मारत असल्याने पर्यटकांना भिजण्यासाठी याठिकाणी चांगली जागा आहे;

परंतु भंडारदरा धरणाच्या सांडव्यातून प्रचंड वेगाने पाणी वाहत असताना अनेक अतिउत्साही पर्यटक थेट सांडव्याच्या पाणी कोसळत असलेल्या ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत आहेत. असा प्रयत्न करणे जिवावर बेतू शकते. तसेच हुल्लडबाजीचा प्रकारही सेल्फी काढताना होत आहे.

मागील आठवड्यात श्रीरामपूर येथील एका युवकाचा रंधा धबधब्यात पडुन मृत्यु झाला, तर एका नाशिकच्या युवकाला राजुर पोलिसांनी मोठ्या धैर्याने पाण्याबाहेर काढले होते. तरीसुद्धा धरणाच्या सांडव्यातुन वाहणाऱ्या पाण्यात जाऊन अनेक पर्यटक सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

राजुर पोलिसांकडुन या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यांची नजर चुकवुन हा प्रकार सुरु आहे. राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण दात यांनी पर्यटकांना आवाहन केले आहे की भंडारदरा पर्यटनस्थळावर धोकादायक, निसरड्या ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करु नये.

असे प्रकार हा तुमच्या जिवावर बेतू शकतात. भंडारदरा हे अतिशय सुंदर निसर्ग पर्यटनासाठी ठिकाण असुन शांततेत पर्यटनाचा आनंद घ्यावा. धांगडधिंगा करणाऱ्या पर्यटकांवर कायद्याचा बडगा उगारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News