केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवत असते. जनतेच्या आरोग्याविषयी विविध योजना शासनाने राबवल्या आहेत. याच पार्शवभूमीवर शासनाने आता प्रधानमंत्री जनआरोग्य गोल्डन कार्ड योजना सुरु केली आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या दोन योजनांचे एकत्रीकरण करून नागरिकांना गोल्डन कार्डचे वाटप सध्या केले जात आहे. यामध्ये ५ लाखांपर्यंत उपचार मोफत मिळणार आहेत. अहमदनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर जिल्ह्यातील ३२ लाख ८५ हजार नागरिक गोल्डन कार्डसाठी पात्र आहेत.
सर्वच रेशनकार्डधारकांना मिळणार गोल्डन कार्डचा लाभ :- सध्या ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळण्यासाठी गोल्डन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड व रेशन कार्ड लिंक असावे लागते. केंद्र सरकारने आता सर्वांचे गोल्डन कार्ड काढण्याबाबत आदेश दिलेले आहेत.
त्यामुळे केसरी, पिवळे रेशन कार्ड धारकांना हा लाभ मिळायचा. आता पांढरे रेशन कार्ड असणाऱ्यांनाही आरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड काढता येणार आहे. पण ही सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू होणार असून, अद्याप त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही अशी माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली.
अहमदनगर जिल्ह्यात जोरदार तयारी :- पात्र असणाऱ्या नागरिकांना त्वरेने गोल्डन कार्ड वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी नुकतीच आरोग्य विभागाची बैठक घेतली असून लोकांना तातडीने आरोग्य गोल्डन कार्ड काढून देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.
१८ डिसेंबर ते २१ डिसेंबर या चार दिवसांच्या कालावधीत आरोग्य विभागाने सुमारे १ लाख २५ हजार लोकांना गोल्डन कार्ड दिले गेले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पात्र ११ लाख ५० हजार लोकांनी मोफत उपचारासाठी गोल्डन कार्ड काढले असून अहमदनगरमधील एकूण ३२ लाख ८५ हजार नागरिकांना योजनेतून कार्ड मिळणार आहे.
कोठून काढता येईल मोफत गोल्डन कार्ड? :- अनेकांना प्रश्न पडला असेल की, गोल्डन कार्ड कुठे काढता येईल? तर तुम्हाला आपल्या भागातील शासकीय आरोग्य केंद्र, गावातील आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायतीतील आपले सरकार सेवा केंद्र येथे तुम्हाला गोल्डन कार्ड मोफत काढून मिळेल. त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी संपर्क साधून आपले गोल्डन कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने केले जात आहे.
गोल्डन कार्डवर कोठे मिळणार मोफत उपचार? :- अहमदनगर जिल्ह्यातील ४३ रुग्णालयांमध्ये गोल्डन कार्ड असणाऱ्यांना ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत दिले जाणार आहेत. ही लिस्ट देखील तुम्हाला संबंधित कार्यालयात उपलब्ध होईल.