अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्री सद्गुरु ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या कृपाशिर्वादाने आणि संत चरणरज छगन महाराज मालुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जयंती निमित्त गुरुवार दि.30 जानेवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा श्रीराम चौकाजवळ शिलाविहार येथील गोंदवलेकर महाराज मंदिरात प्रारंभ होत आहे अशी माहिती सुंदरदास रिंगणे यांनी दिली.
या सप्ताहात पुणे येथील भागवत कथाकार ह.भ.प.श्री शिवगुरु विनायक पारखे शास्त्री आपल्या सुमधुर वाणीतून ही कथा सांगणार आहेत. दुपारी 3 ते 6 या वेळेत भाविकांनी श्रवणाचा लाभ घ्यावा तसेच अखंड हरिनाम सप्ताहात पहाटे 5 ते 7 रुद्राभिषेक, सकाळी 9 ते 10 श्रींचे ग्रंथ वाचन, 11 ते 12 भजन, दुपारी 12 ते 12.30 महाआरती, 12.30 ते 2 पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
दुपारच्या सत्रात 3 ते 6 कथा होऊन सायं. 6 ते 7 हरिपाठ, 7 ते 8.30 महाप्रसाद, 8.30 ते 10 पंचपदी भजन होईल. सामुहीक पारायण सोहळा होणार असून व्यासपिठ चालक सौ. मनिषा भोंग या करतील. 24 तास अखंड नाम जपास भाविक बसणार असून एक-एक तासाने भक्तगण सर्वांना अखंड नामजपास बसण्याची सेवा देणार आहे असे श्री. रिंगणे देवा यांनी स्पष्ट केले.
ज्या भाविकांना पारायणास बसायचे त्यांनी श्री. मते (9225322389), श्री. मुळे (9420953328) यांचेशी संपर्क करावा म्हणजे ग्रंथ उपलब्ध करता येईल. सप्ताहाची सांगता गुरुवार दि. 6 फेब्रुवारी 2020 रोजी जन्मोत्सव, पालखी मिरवणूक, काल्याचे किर्तन व महाप्रसादाने होईल. सकाळी 9 ते 11 ह.भ.प. गणेश महाराज कुठळे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तरी भाविकांनी 7 दिवस या जन्मोत्सव सप्ताहास उपस्थित राहून गोंदवलेकर महाराज यांच्या सेवेचा लाभ घ्यावा असे रेखाताई रिंगणे व सेवाभावी मंडळाने आवाहन केले.