अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! जिल्हा बँकेनं पीक कर्जाची रक्कम एकरी एवढ्या हजारांनी वाढवली

Published on -

अहिल्यानगर- अहिल्यानगरातून शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

बँकेच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत २०२५-२६ या वर्षासाठी खरीप आणि रब्बी हंगामातील बाजरी आणि ज्वारीच्या पिकांसाठीचं पीक कर्ज एकरी दहा हजारांनी वाढवण्यात आलं.

यापूर्वी हे कर्ज एकरी ३०,००० रुपये होतं, आता ते ४०,००० रुपये करण्यात आलं आहे. ही माहिती बँकेचे चेअरमन आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.

या बैठकीत बोलताना कर्डिले म्हणाले की, बँकेने आतापर्यंत अल्पमुदत पीक कर्ज म्हणून तब्बल २४२१ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप केले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची परतफेड वेळेवर करावी, असं आवाहन त्यांनी केलं.

ते म्हणाले, “३१ मार्चपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला तर त्यांना सरकारच्या व्याज परतावा योजनेचा लाभ मिळेल. यामुळे तीन लाखांपर्यंतचं पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळू शकेल.” शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असंही त्यांनी सांगितलं.

कर्डिले यांनी पुढे असंही नमूद केलं की, जे शेतकरी नवीन वाढीव कर्जाचा लाभ घेऊ इच्छितात किंवा ज्यांची थकबाकी आहे, त्यांनी आपलं कर्ज भरलं तर बँक त्यांना तातडीने नवं पीक कर्ज देईल.

त्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२५पूर्वी कर्जाची परतफेड करावी, असं त्यांनी सुचवलं. शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून बँक २९, ३० आणि ३१ मार्च २०२५ या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कर्डिले यांनी स्पष्ट केलं. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीची मुदत वाढवण्याबरोबरच नव्या कर्जाची संधीही मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News