Ahmednagar News : जिल्हा बँकेमार्फत दिल्या जाणाऱ्या पीककर्जाची मर्यादा वाढवण्यात येणार असल्याचे जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी जाहीर केले.
जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांचा जामखेड येथे तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या वतीने चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला, या वेळी ते बोलत होते.
जिल्हा बँक ही ठेवीदारांच्या विश्वासावर चालते, त्यामुळे कर्जवाटप करणे जेवढे महत्वाचे आहे, तेवढेच महत्त्व आपण वसुलीस दिले पाहिजे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करून जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अनुदान द्यावे, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक अमोल दादा राळेभात यांनी या वेळी केली.
या वेळी कर्डिले म्हणाले, बँक नोकरभरतीसाठी नाबार्डची परवानगी मागवली असून, लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करण्यासाठी कर्जाची मर्यादा वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय बँकेच्या एकरकमी परतफेड योजनेचा जास्तीत जास्त थकबाकीदार सभासदांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कर्डिले यांनी या वेळी केले. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून सहकार्याची भूमिका घेतली जाईल, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.
कार्यक्रमास मार्केट कमिटीचे माजी सभापती सुधीर (दादा) राळेभात, उपसभापती कैलास वराट, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण जायभाय, गजानन शिंदे, विठ्ठल चव्हाण, अंकुश ढवळे, अशोक पवार, सतीश ढगे तसेच सहकारी संस्थेचे चेअरमन अण्णासाहेब आजबे, शहाजी पवार, बबन ढवळे, महादेव देडे, महादेव डिसले, गणेश चव्हाण,
राजू बारवकर, अमृत पाटील, किसन बोराटे, बलभीम परकड, अनंता सावंत, आश्रु उगले, राजेंद्र मोटे, सोमनाथ घुमरे, केशव कात्रजकर, मकरंद काशीद, अशोक महारनवर, अविनाश पवार, महादेव डुचे, लक्ष्मण कोल्हे, संजय भोंडवे, नारायण भोंडवे, दादाहरी थोरात,
बाबासाहेब इथापे, पृथ्वीराज वाळुंजकर, ब्रम्हदेव शिंदे, किसन ढवळे, सतीश ढगे, शहाजी केसकर, तुराब शेख, गोकुळ नेटके, साहेबराव बांगर, नवनाथ जावळे, अशोकराव लेंडे याशिवाय व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, सचिव, बँक कर्मचारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. सुधीर दादा राळेभात यांनी आभार मानले.