साईभक्तांसाठी आनंदाची बातमी, शिर्डीमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रात्रीच्या विमानांची उतरण्याची सुविधा झाली सुरू

Published on -

शिर्डी: श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी गुढीपाडव्याच्या निमित्ताने रात्रीच्या विमान उतरण्याची सुविधा सुरू झाली. रात्री साडेनऊच्या सुमारास हैदराबादहून आलेल्या विमानाने शिर्डीत पहिलं नाईट लँडिंग केलं.

गेल्या अनेक वर्षांपासून साईभक्त या सुविधेची वाट पाहत होते, आणि आता त्यांची ही प्रतीक्षा संपली. हे विमान सव्वा दहाच्या आसपास पुन्हा उड्डाण करून परतलं.

रात्री ९:३० वाजता इंडिगो कंपनीचं विमान हैदराबादहून शिर्डीत पोहोचलं, ज्यात ७० प्रवासी होते. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या प्रवाशांचं स्वागत केलं. त्यानंतर सव्वा दहाला हे विमान ६८ प्रवाशांसह पुन्हा हैदराबादकडे निघालं.

शिर्डी विमानतळाचं उद्घाटन साई समाधी शताब्दी वर्षात १ ऑक्टोबर २०१८ रोजी झालं होतं, पण त्यावेळी नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध नव्हती.

यासाठी सीआयएसएफच्या जास्त जवानांची गरज होती. ही सुविधा सुरू व्हावी म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.

गेल्या नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी विमानतळाच्या ६५० कोटी रुपयांच्या नव्या टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन केलं होतं. त्याचबरोबर, राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शिर्डी विमानतळाच्या विस्तारासाठी १३५० कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा केली होती.

आता नाईट लँडिंगची सुविधा सुरू झाल्यामुळे साईभक्तांना रात्रीचा प्रवास करणं सोपं होणार आहे. याचा फायदा फक्त साईभक्तांनाच नाही, तर उत्तर महाराष्ट्रातल्या पर्यटन, शेती आणि उद्योग क्षेत्रालाही होणार आहे.

शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चांगली गती मिळेल. ही सुविधा साईभक्तांसाठी एक मोठी भेटच आहे!

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe