११ मार्च २०२५ श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपरिषदेने मार्च २०२१ मध्ये १०८ कोटींची पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केली होती. त्यात वाढ होऊन पाणी पुरवठा योजनेसाठी अमृत योजना-दोन मधून १७८ कोटींच्या योजना मंजूर झाली आहे. प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण सावंत, तसेच मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा योजना कात टाकून अत्याधुनिक होणार असल्याने श्रीरामपुरकरांना २४ तास पाणी मिळणार आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार श्रीरामपूर शहराची लोकसंख्या ८९ हजार २८२ असली, तरी आज अखेर ती लाखाच्या घरात पोहोचली आहे. श्रीरामपूर शहरासाठी भंडारदरा धरणातील २५३.४६ दशलक्ष घनफूट पाणी राखीव आहे. प्रति मानसी ७० लिटर याप्रमाणे दररोज १ कोटी ७५ लाख लिटर पाणी पुरवठा केला जातो.

सध्या पालिकेकडे ४५० दशलक्ष क्षमतेचा एक मातीचा, तर ३७५ दशलक्ष क्षमतेचा एक आरसीसी, असे दोन साठवण तलाव आहेत. त्यातून ४५ दिवस पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. १९५६ साली पहिली मौलाना आझाद ९ लाख व १९७६ साली उभारलेली कचेरी रोड १४ लाख लिटर, अशोक थिएटर ९ लाख ७० हजार लिटर, मोरगे वस्ती ५ लाख लिटर, भीमनगर ५ लाख, खिलारी वस्ती ५ लाख, गोंधवणी ५ लाख, संजयनगर ९ लाख ७० हजार, मार्केट यार्ड २० लाख, वॉर्ड नं- २ वैदूवाडा येथे २० लाख लिटर, असे एकूण १० जलकुंभ आहेत.
त्यातून शहराला पाणी पुरवठा होतो. १९६५ च्या सुमारास उभारलेला १०.५ दशलक्ष क्षमतेचा जलशुद्धीकरण प्लॅन्ट आहे. शहरात एकूण १६ हजार ६०० नळ कनेक्शन आहेत. शहरासह भैरवनाथनगर, बेलापूर, ऐनतपूर व शिरसगाव ग्रामपंचायतीलाही पाणीपुरवठा केला जातो.
शहरभर पाणी पुरवठ्यासाठी सुमारे १५५ किमी वितरिकांचे जाळे आहे. त्यापैकी ११६ किमी वितरिका अतिशय जुनी वसिमेंटची, तर १५ किमी बीडची, तर ३४ किमी डीआय, अशा १५५ किमी वितरिका आहेत.या वितरिका अतिशय जुन्या झाल्याने वेळोवेळी फुटत असतात.
त्यामुळे नागरिकांसह पाणीपुरवठा यंत्रणेलाही मनस्ताप सहन करावा लागतो. या कटकटीतून कायमची सुटका करण्यासाठी २०५५ वर्षा पर्यंतची अंदाजे १ लाख ३० हजार लोकसंख्या गृहीत धरून विविध भागात अजून वितरिकांचे जाळे वाढवण्यात येणार आहे. सुमारे ३४ किमी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येणार आहे.
अशी असेल प्रस्तावित योजना
योजना अंमलबजावणीसाठी सर्वेक्षण- ३ लाख ५० हजार रुपये, कालव्यात स्क्रिनिंग यंत्रणा- १२ लाख ७६ हजार ९१७, मिल्लतनगर साठवण तलाव खोलीकरण व काँक्रिटीकरण-१०२ कोटी ३८ लाख ९ हजार ८१७, तलावातून ओवरहेड पंप हाऊससह पाणी उपसा-१८ लाख ९७ हजार २०२, पंप हाऊससाठी- ११ लाख २ हजार ९०७, अशुद्ध पाण्यासाठी दाबनलिका-१ कोटी ४२ लाख ८७ हजार ३९, जुने १०.५ दशलक्ष लिटर जल शुद्धीकरण केंद्र निष्कासित करणे-४६ लाख ३० हजार ४९३, नवीन २८ दशलक्ष लिटरचे जल शुद्धीकरण केंद्र बांधणे-८ कोटी ९० लाख ४५ हजार २५०, शुद्ध पाण्याचे दाबनलिका-५ कोटी ३५ लाख ५९ हजार २१४, मौलाना आझाद चौकातील जुने जलकुंभ निष्कासित करणे-२० लाख ३ हजार ४०० व सहा लक्ष लिटर क्षमतेचे नवीन जल कुंभ उभारणे-६९ लाख ६८ हजार ४८४, शहरात ११० मिमीते ४०० मिमी व्यासांचे १३३.६४५ किमी लांब जलवाहिन्या-१६ कोटी २८ लाख ९३ हजार ५१९. दोन्ही साठवण तलावातील अशुद्ध पाणी उपसा यंत्रणा-२ कोटी २२ लाख २९ हजार ५२५.