पाथर्डी, नगर, नेवासा, शेवगाव तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीचे पाणी काही दिवस बंद झाले होते. परंतु या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी स्वतःची यंत्रणा कार्यान्वित करत सर्व लाभधारक पाझर तलावांसह मढीपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी विशेष लक्ष घातले असून मुळा धरणावरील या योजनेची तिसरी मोटार देखील आता सुरू केल्याने लाभधारक शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.
यंदा पाऊस कमी झाल्याने सर्वत्रच दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये मुळा धरणातून मराठवाड्याने देखील पाण्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे वांबोरी चारीला पाणी मिळणार की नाही अशी शंका लाभधारक शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात असतानाच
आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पाथर्डी, राहुरी, नगर तालुक्यातील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लक्षात घेता थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना योग्य त्या सूचना करून काही लाभधारक पाझर तलावांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला.
त्यानंतर लगेच त्यांच्याकडील प्रसाद शुगर साखर कारखान्याचे काही कर्मचारी या योजनेचे पाणी प्रत्येक लाभधारक तलावात पोहोचावे यासाठी मदतीला देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा करंजी, तिसगाव, मिरी लाईनसह मढीपर्यंतच्या सर्वच लाभधारक शेतकऱ्यांच्या या योजनेच्या पाण्यासंदर्भात अपेक्षा वाढल्या आहेत.
कळ दाबण्याचा नव्हे तर पाणी देण्याचा आनंद :- यापूर्वी एकदाही मी कधी कळ दाबायला मुळा धरणावर गेलो नाही. मला कळ दाबण्यात इंटरेस्ट नसून सर्व लाभधारक शेतकऱ्यांना पाणी देण्यास मला आनंद वाटतो. यावर्षी सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असली तरी वांबोरी चारी योजनेच्या माध्यमातून मिरीसह मढीपर्यंतच्या तलावात पाणी पोहोचावे ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. शेतकऱ्यांनी देखील अशा परिस्थितीत सहकार्य करण्याची गरज आहे. या यासाठी मी प्रसाद शुगर साखर कारखान्याचे कर्मचारी देखील मदतीला दिले आहेत.–आ. प्राजक्त तनपुरे
आमदार तनपुरे यांनी लक्ष घातल्यानंतरच खऱ्या अर्थाने वांबोरीचारीला मुबलक पाणी सोडले जाते. यावर्षी इतरांची हौस झाल्यानंतर आमदार तनपुरे यांनी तिसरी मोटर चालू केली आणि स्वतःच्या साखर कारखान्याचे कर्मचारी देखील सोबतीला दिले आहेत. त्यामुळे निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे वांबोरी चारीचे पाणी सर्व तलावात पोहोचेल अशा भावना सरपंच मुनिका शेख, चेअरमन बाळासाहेब लवांडे, सरपंच सुनंदा गवळी, सरपंच विलास टेमकर यांनी व्यक्त केल्या आहेत.