Ahmednagar News : उत्तर अहमदनगरमधील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले व राहुरी या ६ तालुक्यातील नागरिकांना आता अर्धन्यायिक सुनावणी व इतर शासकीय कामांसाठी अहमदनगर येथे जाण्याची आवश्यक नाही.
आज दि. १५ सप्टेंबरपासून शिर्डी येथे नागरिकांच्या सेवेसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होत आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व खासदार सदाशिवराव लोखंड यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यालयाचे आज उद्घाटन होणार आहे.
अनेक दिवसापासून उत्तर नगरच्या नागरिकांना या कार्यालयाची प्रतिक्षा होती. आजपासून अपर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीच्या श्री साईबाबा समाधी मंदिराच्या गेट क्रमांक २ शेजारी सुरू होत आहे.
शिर्डीचे पहिले अपर जिल्हाधिकारी म्हणून बाळासाहेब कोळेकर यांनी पदभार स्वीकारला आहे. या कार्यालयासाठी ६ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी हे कार्यालय प्रमुख असणार आहेत.
त्याशिवाय नायब तहसीलदार, लघुलेखक (निम्नश्रेणी), अव्वल कारकून व २ लिपिक टंकलेखक अव्वल कारकून व २ लिपिक टंकलेखक कार्यरत असणार आहेत. अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित शिर्डी, संगमनेर व श्रीरामपूर प्रांतधिकारी तसेच ६ तालुक्यातील तहसीलदार, ५१ मंडळाधिकारी असणार आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या नंतर उत्तर अहमदनगरमधील सहा तालुक्यांतील प्रांतधिकारी, तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी कार्यालयावर अपर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण असणार आहे.
अर्धन्यायिक प्रकरणात अपिलीय अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी कामकाज पाहणार आहेत. यात मुख्यतः- सातबारा, फेरफार, कुळ वहिवाट वहिवाट रस्ता अशा बऱ्याच प्रकरणात तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी आदेश करत असतात.
अशा प्रकरणात नागरिकांना अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल करता येणार आहे. गौण खनिजांमध्ये रेती, मुरूम, डबर, स्टोन क्रेशर खडी, विटा व माती या गौण खनिजांना परवाने देणे,
विविध खाणपट्ट्यांना परवानगी देण्याचे काम या कार्यालयामार्फत चालविले जाणार आहे. रेती घाटाचे संपूर्ण नियोजन येथून होणार आहे. रेती लिलाव, मोजणी, दंडात्मक कारवाई अशा विविध कामांवर नियंत्रण या कार्यालयाचे असणार आहे.