१८ मार्च २०२५ : अहिल्यानगर : शहरातल्या उद्योगनगरीत म्हणजेच नागापूर एमआयडीसी परिसरात गुंडागर्दी सर्रास चालूच आहे.खूनाच्या आणि दुकानावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणानंतर पोलिसांकडून चमकोगिरी कारवाई सुरु आहे.पण असे असूनही गुन्हेगाराची वाढतच आहे.एमआयडीसी भागातील चौकात सुट्टे पैसे दिले नाही म्हणून टपरी मालकाला चक्क लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना शनिवारी क्रॉम्प्टन ग्रिव्हज कंपनी समोर घडली आहे.त्यामुळे पोलिसांनी कारवाई करून सुद्धा एमआयडीसी भागात गुंडाराज चालूच आहे असे यावरून स्पष्ट होत आहे.
मनोज साळुंखे (पूर्ण नाव माहीत नाही, रा.गणेश चौक, नवनागापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर प्रथमेश डेव्हिड पवार (वय २०, रा. चक्रधरस्वामी मंदिराच्या पाठीमागे, नागापूर) यांनी याबद्दल तक्रार दिली आहे.फिर्यादी यांनी क्रॉम्प्टन ग्रिव्हज कंपनी समोर नाश्त्याची गाडी लावली होती.शनिवारी (दि. १५) संध्याकाळी सहाच्या आसपास आरोपी नाष्ट्याच्या स्टॉलवर आला.त्याने खाऊन झाल्यानंतर त्याने ५० रुपयांच्या बिलापोटी ५०० रुपये दिले.तेव्हा फिर्यादीच्या वडिलांनी त्याला सांगितले कि,आमच्याकडे सुट्टे पैसे नाहीत.सुट्टे पैसे द्या.

त्यामुळे सुट्टे पैसे नाहीत हे ऐकल्यावर रागाच्या भरात आरोपीने फिर्यादीच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली,तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.यापूर्वी सुद्धा निंबळक चौकातील दुकानावर काही गुंडांनी हल्ला केला होता.त्या हल्ल्यात दुकानदारासह त्यांचे नातेवाईक सुद्धा जखमी झाले होते.
या प्रकरणी पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली आहे.या घटनेची दखल घेऊन पोलिसांनी ठोस उपाय करायला पाहिजे होता.मात्र,एमआयडीसी पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई केली गेली नाही.म्हणून या भागातील लहान-मोठ्या गुंडांचा धुमाकूळ वाढत असून त्यांनी पुन्हा डोकेवर काढले आहे. शुल्लक कारणावरून सर्वसामान्य नागरिकांना मारहाण केली जाते.त्यामुळे इथले उद्योजकसुद्धा घाबरलेले असून, ठोस कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
त्या पोलिस कर्मचाऱ्याच्या चौकशीत कोणती माहिती समोर आली ?
सावेडीतील वैभव नायकोडी या तरुणाचे अपहरण आणि खून प्रकरणाच्या गुन्ह्यातील सर्व आरोपी हे नागापूर एमआयडीसी परिसरातीलच असल्याचे समोर आले आहे.त्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून नायकोडी याला मारहाण झाल्याची महिती एमआयडीसी पोलिस ठाण्यात एका कर्मचाऱ्याला आधीच मिळाली होती परंतु तो पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचून सुद्धा त्याने त्या आरोपींना थांबविले नाही.त्या ठिकाणावरून तो पोलीस कर्मचारी तीथून परत आला.त्या बद्दल त्या संबंधित कर्मचाऱ्याची पोलिस उपअधीक्षकांकडून चौकशी चालू असून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समजत आहे.